नांदेड| कोवीड - 19 पार्श्वभूमीवर राज्यात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या विशेष महिला ग्रामसभा रद्द झाल्या असल्या तरी तंत्रज्ञान माध्यमातून महिला तक्रारी सोडवण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्या आदेशावर उप सचिव ए.का. गागरे यांची स्वाक्षरी आहे.
ग्रामपंचायत नियमावली प्रमाणे ग्रामसभा घेण्याची तरतूद आहे.ग्रामसभेपूर्वी विशेष महिला ग्रामसभा आयोजित केली जाते.पण सध्याच्या कोवीड पार्श्वभूमीवर ग्रामसभा आयोजन रद्द करण्यात आले आहे.जास्त संख्येत लोक जमतात आणि मोठी जनसंख्या कोरोना विषाणूला जास्त प्रभाव दाखवण्यासाठी मुभा देते. पण ग्रामसभा आयोजनापूर्वी महिला विशेष सभेत त्यांच्या तक्रारी जाणून घेणे सुद्धा अत्यंत आवश्यक असते. म्हणून यंदाच्या 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभा रद्द असल्या तरीही पदाधिकारी,अधिकारी आणि महिला प्रतिनिधींनी व्हाट्स अप.ई मेल,फोन आधी तंत्रज्ञान पद्धतीने महिलांच्या तक्रारी जाणून घ्याव्यात आणि त्यांची सोडवणूक करावी असे आदेशात सांगितले आहे. हा आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे.