उर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार – उपमुख्यमंत्री -NNL


मुंबई|
ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांपैकी एक असलेल्या इटली येथील एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क कंपनीने ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जासह इतर क्षेत्रांत महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर ॲन्ड नेटवर्क कंपनीचे ग्लोबल बिझनेस डेवलपमेंट विभागाचे प्रमुख मार्सेलो कॅस्टीलो आगुर्तो यांनी आज सागर निवासस्थानी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी एनेल कंपनीने ऊर्जासह विविध क्षेत्रात केलेली कामे, नावीन्यपूर्ण बाबींची माहिती श्री. आगुर्तो यांच्याकडून जाणून घेतली. वीजनिर्मिती, वीजवितरण, वीजगळतीवरील उपाययोजना आदींबाबत काय करता येईल, याबाबतही त्यांनी माहिती घेतली. राज्यात आपण कशाप्रकारे गुंतवणूक करु इच्छिता याबाबत कंपनीच्यावतीने सविस्तर आराखडा आणि सादरीकरण करण्याची सूचना त्यांनी केली.

कमी खर्चिक, वीजगळतीचे प्रमाण कमी करणे आणि सध्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे यादृष्टीनेही कंपनीने काम करण्याची राज्य शासनाची अपेक्षा असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. श्री. आगुर्तो यांनी, ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूकी सोबतच त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ येथेच उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रशिक्षण देण्यासाठीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी