तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन -NNL


सध्यस्थितीत तूर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून मागील ३ -४ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडे देऊ शकतात. या सर्व बाबी तुरीवरील घाटेअळी / शेंगा पोखणारी अळीस पोषक असल्यामुळे सध्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येऊ शकतो. काही ठिकाणी अळीने तुरीवरील कळ्या, फुले व शेंगा फस्त करण्यास सुरुवात केली आहे. या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे नियंत्रण होऊ शकते.

शेंगा पोखरणाऱ्या अळ्या सुरुवातीच्या काळात पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलावर किंवा शेंगावर उपजीविका करतात, नंतर शेंगा भरतांना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगामध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेऊन आतील कोवळ्या दाण्यावर उपजीविका करतात.

एकात्मिक व्यवस्थापन : पाने व फुलांची जाळी करणारी अळीची प्रादुर्भावग्रस्त जाळी गोळा करून अळीसह नष्ट करावी तसेच शेंगा पोखरणारी अळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून त्यांचा नायनाट करावा.

तूर पिक कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे (फेरोमोन ट्रॅप) पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत व निरीक्षण करावे.

शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत, यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल.

पिक कळी अवस्थेत असतांना निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझॅडीरॅक्टिन ३०० पीपीएम ५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची ५ मिली १० लिटर पाण्यातून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.

जर किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर आढळून आल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्युबेन्डामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा क्लोरॅनट्रीनीलीप्रोल ९.३ + लॅमडा साहॅलोथ्रीन ४.६ झेडसी ४ मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मारुका किडीसाठी इंडोक्झाकार्ब १४.५ एससी ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीन पट वापरावी.

शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा व सुरक्षिततेची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच गुटखा, तंबाखूचे सेवन करु नये व बीडी ओढू नये.

माहितीः उपसंचालक (कृषी), कृषी आयुक्तालय पुणे,तांत्रिक माहिती: व.ना.म.कृ.वि.परभणी,संकलनः जिमाका, अकोला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी