नांदेड| नांदेड आणि लातूर जिल्ह्याच्या काठावर असलेला मुखेड तालुक्यातील शंभर बेडचे कोविड केअर सेंटर. रोज नित्य-नियमाप्रमाणे सकाळी इथे उपचार घेणारे बाधित उठतात. सकाळच्या प्रातक्रिया आटोपून ही मंडळी एका वेगळ्या गोष्टीसाठी अतुरतेने वाट पाहत असतात. मुखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. आनंद पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली डॉ. संतोष टांकसाळे व त्यांची टिम कार्यरत असलेल्या या सेंटरचे समुपदेशक शौकतअली मदार बेग बरोबर 9 वाजता या सर्वांमध्ये दाखल होतात
सुरुवातीचा एक तास योगा आणि प्रार्थनेच्या रुपात तो सुरु करतो. दिर्घ श्वासाच्या काही क्रिया तो घेतो. एरवी योगाच्या साध्या छोट्या क्रियेपासून जे बहुसंख्य लोक दूर असतात त्यांच्यासाठी थोडे बहुत कुतुहल जागे होते. जे थोडे बहुत शिकलेले आहेत ते लोकं काही प्रश्न उपस्थित करतात. अशांना समजवत व्यायामाचा हा तास पूर्ण होतो. यात सारे बाधित ज्याची वाट पाहत असतात ती प्रार्थना जवळ येते. या बाधितात आठव्या वर्गात शिकत असलेली कु. संजीवनी काशिनाथ बोडके ही मुलगी प्रार्थनेला सुरुवात करते. नकळत सगळ्यांचे हात जोडले जातात, डोळ मिटतात आणि शब्द सुरु होतात “हीच अमची प्रार्थना अन् हेच अमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..!”
प्रार्थना संपल्यावर समुपदेशात प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून वेगळा तास सुरु होतो. असंख्य खूप साधेसाधे प्रश्न इथे दाखल झालेले बाधित बेगला विचारत राहतात. “माझं काही दूखत नसतांना मला इथे कशाला आणलं आहे..., घरी गेल्यानंतर मला असेच राहवे लागेल का..., मला भावासोबत जवळ राहून बोलता येईल का..., पुन्हा लोकात मला मिसळता येईल का...असे कितीतरी प्रश्न” या सर्व प्रश्नांचे निरसन करुन बाधितांच्या चेहऱ्यांवर हसू आणण्यासाठी समुपदेशक बेग पुढच्या तयारी लागतो. त्याला तिथल्या व्यवस्थापनाबाबत जेंव्हा आपण विचारतो तेंव्हा तो सांगून जातो “साहेब या आजाराला ग्रामीण भागात वेळेवर अषोधोपचार सुरु करण्यासमवेत समुपदेशनच खूप लाख मोलाचे आहे.” मागील पाच महिन्यांपासून बेग हा दररोज नित्यनियमाने या कोविड बाधितांच्या वार्डात जाऊन समुपदेशनाचे काम करीत आहेत. याबाबत काळजी घ्यायची कशी हा प्रश्न त्याला जेंव्हा आपण विचारतो तेंव्हा तो सांगतो “हाताला सतत सॅनिटाइज करणे, पाच फुट अंतर ठेवून बोलणे, सतत मास्क लाऊन राहणे एवढी काळजी मी जबाबदारीने घेतो. त्यांच्या शंकांचे समाधान ही माझ्यासाठी मोठी ऊर्जा आहे. पॉझिटिव्ह सोच ठेवली की सारे काही सोपे होते.” हे सांगायलाही तो विसरत नाही.
“देगलूर विभागात असलेल्या ग्रामीण भागात अजूनही लोक कोविड-19 ला गंभीरतेने घेत नाही. खेड्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. इथले बहुसंख्य लोक मास्क खिशात ठेवतील पण वापरणार नाहीत. या लोकांनी आता स्वत:हूनच वर्तनात बदल आणून योग्यती सुरक्षा घेतली पाहिजे” अशी अपेक्षा इथले उपविभागीय दंडाधिकारी शक्ती कदम यांनी सांगितले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शासनाला जे काही शक्य होत आहे त्यापरिने आम्ही वैद्यकिय सेवा सुविधा इथे उपलब्ध केल्या आहेत. वेळप्रसंग पडल्यास आव्हानात्मक स्थितीतही आम्ही पूर्ण क्षमतेने कार्य करु, असा विश्वास त्यांनी दिला. मुखेडमध्ये सद्यस्थितीत 100 बेडचे कोरोना केअर सेंटर, ऑक्सीजनची सुविधा असलेले 40 बेड, आयसीयूमध्ये 10 बेड उपलब्ध आहेत. शिवाय आयटीआयची इमारत आम्ही ताब्यात घेतली असून यात 500 बेडची क्षमता आम्ही तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले.