स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही मराठवाड्यातील कोळी महादेव कोळी मल्हार जमातीच्या नशिबी नैराश्य आणि उपेक्षाच! -NNL


15ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. आणि त्या पुढील काळात भारतातील तत्कालीन अनेक संस्थाने ही स्वतंत्र भारतात विलीन झाली. हजारो बांधवांच्या सत्याग्रहानंतर आणि शेकडो बांधवांच्या बलिदानानंतर भारत सरकारच्या ऑपरेशन पोलो  कारवाईने हैदराबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात विलीन झाले. 26 जानेवारी 1950 पासून स्वतंत्र भारताचा कारभार भारतीय संविधानानुसार सुरू झाला. त्यानंतर 6 सप्टेंबर 1950 ला भारत सरकारने अनुसूचित जाती- जमातीची स्वतंत्र यादी प्रकाशित करून अनुसूचित जाती- जमातीसाठी आरक्षण लागू केले महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नसल्यामुळे 6 सप्टेंबर 1950 च्या अनुसूचित जाती- जमातीच्या आरक्षणाचा फायदा मुंबई प्रांत वगळता महाराष्ट्रातील इतर भागांना- प्रांतांना झाला नाही.

त्याच वेळेस मुंबई प्रांतातील गैर/बिगर जाती-जमातींनी आरक्षणाचा फायदा घेऊ नये यासाठी 29 ऑक्टोबर 1956 ला मुंबई प्रांतासाठी क्षेत्र बंधन लावले. त्यानंतर दोन दिवसांनी 1 ऑक्टोबर 1956 ला हैदराबाद संस्थान मुंबई प्रांताचा भाग झाला. त्यानंतर भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दिलेल्या आयोगाच्या शिफारसीनुसार मराठी भाषकांचे मुंबईसह महाराष्ट्र निर्मिती 1मे 1960 रोजी झाली. मुंबई प्रांतातील गैर/बिगर जाती-जमातींनी आरक्षणाचा फायदा घेऊ नये यासाठीच 1956 मध्ये क्षेत्र बंधन लावले होते पण त्यानंतर मुंबई प्रांताचा भाग झालेल्या आणि महाराष्ट्राचा भाग बनलेल्या विदर्भ मराठवाडा या प्रांतांना & प्रांतातील जाती-जमातींना याचा फटका बसला. 1956 च्या क्षेत्र बंधनामुळे नव्याने समाविष्ट भागातील जाती- जमाती यादीत पूर्वीच समाविष्ट असूनही या जमा जाती-जमातींना त्या आरक्षणाचा फायदा होत नव्हता त्यामुळे 1956 च्या क्षेत्र बंधना बाबत सर्वच ओरड सुरू झाली. 

अनेक जाती-जमातीतून 1956 चे क्षेत्र बंधन रद्द करण्याबाबत मागणी करण्यात येऊ लागली. 1956 च्या क्षेत्र बंधना मुळे कोणकोणत्या जाती- जमाती वंचित राहिल्या आहेत याचा आढावा 1961 च्या जनगणनेनुसार घेण्यात आला. आणि 1961 च्या जनगणनेची संदर्भसूची पाहता जुन्या हैदराबाद- निजाम राज्यात कोळी महादेव, कोळी मल्हार या जमाती 1950 च्या कित्येक वर्षापूर्वी पासून त्या भागात वास्तव्यास असल्याबाबत पुरावे पाहून त्या जमातींना  व अन्य राज्यातील इतर जाती- जमातींना सवलतीस पात्र ठरवण्यासाठी भारत सरकारने संसदेत ॲक्ट 108/1976 नुसार अनुसूचित जातीतील "कैकाडी" व अनुसूचित जमातीतील "थोटी व चोथरा या जमातीसाठी क्षेत्र बंधन कायम ठेवून इतर जाती- जमातीसाठी असलेले क्षेत्र बंधन रद्द केले.आणि भारत सरकारने 27 जुलै 1977 नुसार क्षेत्र बंधन रद्द केल्याबाबतचे राजपत्र प्रकाशित केले.

आत्ताचा मराठवाडा हा पूर्वी  निजामाच्या हैदराबाद राज्याचा भाग होता. निजामाच्या हैदराबाद राज्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात कोळी महादेव, कोळी मल्हार जमातींना "कोळी" या संज्ञेने -जनरिक टर्मने संबोधले गेले. कारण हैदराबाद राज्याची 1921 ची जनगणना अभ्यासली असता त्यात कोळी" या संज्ञेखाली असे लिहिले आहे की; अनेक जाती आणि उपजमाती असल्या तरी या राज्यात मल्हार कोळी आणि महादेव कोळी हे दोनच प्रकार आढळून येतात असा स्पष्ट उल्लेख आढळतो.

 याशिवाय निजाम राज्यातील पूर्ण जाती -जमातीसाठी हैदराबाद राज्याच्या तत्कालीन उच्च न्यायालयाचे न्यायधीश  मा.सय्यद सिराज उल हसन यांच्या कडून लिहिल्या गेलेले आणि 1920 मध्ये प्रकाशितझालेला जो ग्रंथी आहे त्या ग्रंथाचे नाव The Castes and Tribes of H.E.H.The Nizam's Dominions  यामध्ये हैदराबाद निजाम राज्यातील एकूण 98 जाती- जमाती बद्दल विस्तृतपणे वर्णानुक्रमे(Alphabetically) जाती- जमाती संबंधी लिहिले असून त्यात 35 क्रमांकावर "कोळी" जमातीच्या बाबतीत Internal  structure लिहिताना असे म्हटले आहे की, The Kolis are divided into several Indogamous  sub tribes of two which Malhar Koli and Mahadev koli are to be found in these Dominions.

शिवाय मराठवाडा साहित्य परिषदेमार्फत 1954 मध्ये प्रकाशित केलेल्या आणि हैदराबाद शासनाच्या शिक्षण खात्याने पुरस्कृत केलेल्या लेखक र. मु. जोशी लिखित "हैदराबादचे लोक" या पुस्तकात कोळी संज्ञेखाली "कोळ्यांच्या अनेक उपजाती आणि पोट जाती असल्या तरी आपल्या राज्यात मल्हार कोळी आणि महादेव कोळी असे दोनच प्रकार आढळतात"

तसेच सन 1836 ते 1838 या काळात प्रत्यक्ष फिल्डवर कार्य केलेल्या ब्रिटिश अधिकारी कॅप्टन मेकिंग टोश यांच्या Transactions of the Bombay geographycal society या सन 1844 मध्ये प्रकाशित ग्रंथात अहमदनगर मधील महादेव कोळ्यांच्या बाबतीत अहमद नगर मधील महादेव कोळ्यांचे परंपरागत मूळ वस्ती स्थान हैदराबाद राज्यातील बालाघाट- महादेव डोंगर रांगा हे असून तेथून हे लोक काही प्रमाणात  नगर- नाशिक मध्ये स्थलांतर झाल्याचे म्हटले आहे.

अहमदनगर गॅजेटीयर 1881 व ठाणे गॅझिटिअर 1882 यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की, नगर, ठाणे मधील महादेव कोळ्यांचे परंपरागत वस्तीस्थान निजाम राज्यातील बालाघाट- महादेव डोंगररांगा हे आहे जे की ह्या रांगा सध्याच्या मराठवाड्यातील परभणी, बीड, उस्मानाबाद, नांदेड लातूर जिल्ह्यातून जातात. नगर जिल्ह्यातील  सोनाजी गोपाळ मराठा व गवळी युद्धात झालेल्या मनुष्य वधामुळे रिक्त झालेला प्रदेश भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर महादेव कोळ्यांना नगर नाशिक मध्ये आणण्यात आले असेही त्यात वर्णन आले आहे.

असे स्पष्टपने लिहिले असतानाही महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विभाग वेगवेगळी परिपत्रके काढून आणि अधिकाऱ्यांना वारंवार तोंडी सूचना देऊन मराठवाड्यात महादेव कोळी, मल्हार कोळी नाहीत असा जावई शोध लावून या दोन्ही जमातींना त्यांच्या संवैधानिक हक्कापासून वंचित ठेवण्याचे सततचे षडयंत्र करत आहे. ह्या होणाऱ्या अन्यायाबाबत महाराष्ट्रात झालेल्या अनेक मुख्यमंत्र्यांकडे अनेक वेळा, अनेक निवेदने दिली,  चर्चाही झाल्या पण महाराष्ट्र राज्यातील 25 आदिवासी आमदारांच्या भीतीपोटी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपली खुर्ची केवळ शाबित राखण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीच्या अनेक संघटनांनी मा. उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती- जमाती आयोग व केंद्र शासनाच्या नियंत्रणात असलेल्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे(NCST) ही याचिका दाखल केल्या आहेत. पण ह्या दोन्ही आयोगाकडून त्यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. आणि आयोगाने कुठलाही निर्णय दिलेला नाही. महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जाती- जमाती आयोग व भारत सरकारचा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग हे केवळ वेळ काढू धोरण अवलंबितात. त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75  वर्षा नंतर म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षातही मराठवाड्यातील महादेव कोळी व मल्हार कोळी जमातीचे पारंपारिक मूळ वस्तीस्थान असलेल्या जमातीलाच त्यांच्या संविधानिक हक्क व आरक्षणापासून वंचित ठेवल्यामुळे या दोन्ही जमातीच्या नशिबी नैराश्य आणि उपेक्षाच आली आहे. हे स्वातंत्र्य म्हणजे केवळ ह्या जमातीसाठी केवळ मृगजळ ठरत आहे अशी या जमातीची भावना झाली आहे.

रमेश पिठ्ठलवाड पालम. परभणी, 9860068421

मराठवाडा अध्यक्ष, आदिम विकास परिषद.

2 Comments

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी