पोर्तुगाल येथे होणाऱ्या आयवॉज 2022 जागतिक दिव्यांग क्रीडा स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड -NNL


नांदेड।
दि.१९ येथील आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू, तथा नांदेड जिल्ह्याची भूमिकन्या, महाराष्ट्र भूषण भाग्यश्री माधवराव जाधव यांची पोर्तुगाल येथे  होणाऱ्या आयवॉज 2022 या जागतिक स्तरावरील दिव्यांग खेळाडूंच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड झालेली ती एकमेव महिला खेळाडू आहे. 

नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज  येथील रहिवासी असलेली व कंधार येथील श्री शिवाजी विधी महाविघालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री जाधव हिने  दिव्यांगांच्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट केलेली आहे.

दुबई येथे झालेल्या फाजा चॅम्पियनशिप व चीन येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.त्यानंतर गतवर्षी टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक  क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात भाग्यश्री जाधव हिची निवड झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू होती. तिने या स्पर्धेत जागतिक पातळीवर सातवे स्थान प्राप्त केले आहे. गेल्या ऑगस्टमध्ये बेंगलोर येथे झालेल्या चौथ्या इंडियन नॅशनल ओपन पॅरा स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात तिने सुवर्ण पदक पटकावले होते.

 येत्या दि.२३ ते २९ नोव्हेंबर दरम्यान पोर्तुगाल येथे जागतिक स्तरावर आयवॉज २०२२ ही  दिव्यांग खेळाडू यांची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड झाली असून या स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.या स्पर्धेसाठी निवड झालेली महाराष्ट्रातील एकमेव महिला दिव्यांग खेळाडू आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग खेळाडूंच्या होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भाग्यश्री जाधव यांनी नेहमीच महाराष्ट्राचे  प्रतिनिधीत्व करून महाराष्ट्राची शान राखली आहे.

या निवडी बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना भाग्यश्री जाधव म्हणाल्या की, राज्यातील ग्रामीण व शहरी भागात क्रीडा क्षेत्रा बरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक कोहीनूर हिरे आहेत. पण आर्थिक विवंचने मुळे ते हतबल होतात त्यामुळे आपोआप  स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. त्यांचा क्रीडा प्रवास सुरू झाल्या बरोबर लगेच संपतो. अशा गुणी रत्नांची  समाजाला ओळखच होत नाही. त्यांच्यात दडलेल्या सामर्थ्याला शक्ती देणे, त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी  मदतीचा हात देण्याची आज खरी  गरज आहे.  

नांदेड जिल्ह्यात गुणवंत  खेळाडूंची खाण आहे. पण त्यांचा शोध घेऊन त्यांची पारख केल्या जात नाही. उलट चांगल्या खेळाडूंचे मानसिक खच्चीकरण करून त्यांचे खेळावरील लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न काही लोक जाणीवपुर्वक करतात. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. अशी खंत तिने व्यक्त केली. माझ्या या संपुर्ण प्रवासात माझे मार्गदर्शक मराठी पत्रकार परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष प्रकाश कांबळे, भाजप दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा हिंगोली जिल्ह्याचे माजी नियोजन अधिकारी श्री.रामदास पाटील सुमठाणकर, मुख्य प्रशिक्षक एस. सत्यनारायण (बेंगलोर) बेसिक ट्रेनर श्रीमती पुष्पा (बेंगलोर) , मातोश्री मंजुळाबाई खतगावकर

 वसतीगृहाचे सुधीर पाटील,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे, विवांश जिमचे अनिल पाटील भालेराव, शशिकांत पाटील बेळीकर, मराठा सेवा संघ, दिव्यांग कृती समिती, साई परिवार, राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे, वरिष्ठ पोलीस प्रशिक्षक शेरू मास्तर, सविता पतंगे व उपचार करणारे सर्व डॉक्टर यांचे नेहमी सहकार्य लाभते. माजी आमदार स्व. बापुसाहेब गोरठेकर यांनी त्यांच्या हयातीत मला वेळोवेळी नेहमी सहकार्य केले, असा कृतज्ञतापुर्वक उल्लेख तिने केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी