महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला -NNL


मुंबई|
“मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरात आणि मनामनात पोहचविणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे”,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्रीमती चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची मोठी हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, “ महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा आवाज एक मोठा ठेवा आहे. त्यांना आवाजाचे वरदानच मिळाले होते. या आवाजाची ताकद ओळखून त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि कलासाधनेतून अनेक गाणी अजरामर केली. मराठी लोककलेचं वैशिष्ट्य असणाऱ्या लावणीमध्ये तर त्यांनी श्वासच फुंकला. लावणीची नजाकत त्यांनी आपल्या सुरांनी जिवंत केली. त्यामुळंच तमाशा फडातील ही लावणी घऱाघरात आणि मनामनापर्यंत पोहचली. पार्श्वगायनासह, लावणीचे विविध प्रकार त्यांनी खुलवून सादर करत रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. 

त्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून उमेदीच्या काळात विविध कारणांसाठी निधी उभारणीकरिता जाहीर कार्यक्रम केल्याची उदाहरणे आजही दिली जातात. अशा लोककलेशी आणि समाजाशी एकरूप, सहृदय महान कलावंताचे निधन हे महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्राची हानी आहे. ज्येष्ठ गायिका, लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली. दरम्यान, श्रीमती चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.

 आई मला नेसव शालू नवा, खेळताना रंग बाई होळीचा, कळीदार कपुरी पान, फड सांभाळ तुऱ्याला गं आला, पाडाला पिकलाय आंबा अशा अनेक लावण्यांना आपला खर्जातला आवज देऊन त्यांनी रसिक मनाला तृप्त केलं. ६० आणि ७० चं दशक त्यांनी अक्षरशः गाजवलं. १९६५ मध्ये त्यांना लावणी सम्राज्ञी ही पदवी देण्यात आली. एवढंच नाही तर यंदाचा २०२२ च्या पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं. आपल्या उमेदीच्या काळात गाण्यांसाठी तसेच इतरांच्या मदतीसाठी सुलोचना यांनी फक्त महाराष्ट्रच नाही तर देशही पालथा घातला होता. मात्र पद्मश्री पुरस्काराला व्हिलचेअरवरून जाताना त्यांना पाहून अनेकांना जुन्या कणखर सुलोचना चव्हाणच आठवल्या.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी