नांदेड। दिव्यांग व्यक्तींना स्वाभिमानाने समाजामध्ये वावरण्यासाठी आगळे वेगळे उपक्रम सातत्याने घेऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या कार्याची दखल घेऊन समाज कल्याण विभागातर्फे जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांच्या हस्ते " संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता "हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शासनातर्फे मिळालेल्या या पुरस्कारामुळे दिलीप ठाकूर यांच्या पुरस्काराची संख्या ७२ झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात जि.प. समाज कल्याण विभागातर्फे घेण्यात आलेल्या दिव्यांगांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे,मनपा आयुक्त सुनील लहाने,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीप प्रज्वलानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी केले. भ्रमिस्टांचा कायापालट, दिव्यांगांसाठी भाऊचा डबा यासारख्या उपक्रमासाठी दिलीप ठाकूर यांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व ग्रंथ भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी पुढील वर्षापासून दिव्यांगांना पोट तिडकीने शिकवणाऱ्या एका शिक्षकाची निवड समाज कल्याण विभागातर्फे करून त्यांना दिलीप ठाकूर यांच्यातर्फे रोख रुपये पाच हजार, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे दिलीप ठाकूर यांच्या वर्षभरातील उपक्रमाची संख्या ७८ झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निर्मल सर तर आभार प्रदर्शन मधुकर गोडबोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मनीषा तिवारी, बेलोकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.