राष्ट्रगीताचे समूह गायन, विश्वविक्रमाची एक संधी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL


मुंबई|
दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१ मिनिटे  या कालावधीत, राज्यातील प्रत्येक नागरिकाने; "सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात" सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या "स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना पुढे आलेली असून, राज्यातील अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी पुढे म्हटले आहे. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्यात या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांना निर्देश देण्यात आल्याची माहिती, राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिली. सामूहिक राष्ट्रगीत गायनासंदर्भात राज्य शासनाने सविस्तर शासन निर्णय निर्गमित केलेला असून, प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम लोकसहभागातून साजरा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले की, देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत आहोत. नागरिकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज व आपले राष्ट्रगीत याविषयी पवित्र भावना आहेच, त्याच पवित्र भावनेला सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. 

राज्यातील अंगणवाड्या, सर्व प्रकारच्या शाळा/ महाविद्यालये/ सर्व प्रकारची विद्यापीठे/ खाजगी/ शासकीय सर्व शैक्षणिक संस्था मधील विद्यार्थी, व्यापारी प्रतिष्ठाने, सेवा पुरवठादार, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेणे अपेक्षित आहे. नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील, त्या ठिकाणी राष्ट्रगीताचा सन्मान ठेवून या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे असेही सौरभ विजय यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केलेल्या या आवाहनास राज्यातील सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा आणि आपणा सर्वांच्या सहभागातून एक नवा विश्वविक्रम व्हावा यासाठी शासनाच्या वतीने हे आवाहन असल्याचे सौरभ विजय यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी