नांदेड| जुना कौठा नांदेड येथील सुप्रसिध्द लेखक, कवी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.बा.दा.जोशी सर यांचे आज दि. 18 फेब्रुवारी दुपारी 1.30 वा. पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात दु:खद निधन झाले. मृत्युसमयी ते 79 वर्षाचे होते. उद्या दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वा. गोवर्धनघाट नांदेड येथे अंत्यविधी होणार आहे.
पैठण येथील संतकवी श्री उत्तमश्लोक, माहुरगड येथील विष्णुदासाचे संशोधक व अभ्यासक प्रा.डॉ. बा.दा.जोशी हे गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेडचे माजी उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. श्री उत्तमश्लोक वाङमय मंडळ उमरखेड, श्री उत्तमश्लोक वाचनालय उमरखेडचे अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ शाखा, उमरखेड आणि अमरावती विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषद पुसदचे अध्यक्षपद भुषविले होते. ते साकळे विद्यालय व रेणुका माता विद्यालय होळी नांदेडचे संचालकही होते.
अमरावती विद्यापीठ, स्व.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठ, नाशिकचे पीएच.डीचे मार्गदर्शक होते. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच. डी. व एम.फिल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विविध वर्तमानपत्रातून विपुल लेखन करुन वाङमय सेवा केली.
नांदेड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा नांदेडचे प्रबोधन प्रमुख व मराठवाडा संघटक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. तसेच वसुधैव कल्याणकारी ज्येष्ठ नागरिक संघ जुना कौठा, नांदेडचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. प्रा. आनंद कृष्णापुरकर व इंजि. प्रसाद कृष्णापुरकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी प्रा.डॉ. सौ. वसुधा जोशी, दोन मुलं, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.