बियाणी हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याच्या मागणीसाठी खा.चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या भाजपाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने -NNL

निदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे गोजेगावकर आणि साले यांचे आवाहन


नांदेड|
येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून भरदिवसा हत्या करण्यात आली. या घटनेला पंधरा दिवसाचा कालावधी लोटत येत असला तरी अद्यापही नांदेड पोलिसांना या घटनेचा तपास लावता आला नाही. त्यामुळे नांदेड पोलिसांकडून बियाणी हत्येचा तपास काढून तो सीबीआयकडे देण्यात यावा या मागणीसाठी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली दि. 20 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या निदर्शनांमध्ये विविध सामाजिक संघटना, व्यापारी, राजकीय मंडळी आणि नांदेडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे. 

नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्था प्रचंड बोकाळली आहे. पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यानेच माफियागिरी आणि गुन्हेगारीला उधाण आले आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सर्वच भागात अवैध धंदे बिनबोभाटपणे सुरू आहेत. गोळीबार, तलवारबाजी, चाकू, खंजीरने मारून लुटण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. एका घटनेचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच दुसरी घटना घडत असल्याने नांदेड शहरातील डॉक्टर्स, वकील, कोचिंग क्लासेस चालक , उद्योगपती, व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच परिस्थितीत दि. 5 एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तीन वर्षापूर्वीच बियाणी यांच्यावर खंडणी मागण्यासाठी पिस्तूल रोखण्यात आले होते. त्या वेळेसही पोलिसांनी कचखाऊ भूमिका घेतली तर नंतर पोलिसांनी बियाणी यांना दिलेली संरक्षणही काढून घेतले. 

एकूणच परिस्थिती पाहता हे सर्व प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट वाटत आहे. त्यामुळे नांदेड पोलिसांना या प्रकरणाचा तपास लावणे शक्य नाही, महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाचा तपास लावू शकत नाहीत, असा गंभीर आरोप करत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. आता याच मागणीसाठी आज दि.20 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता निदर्शने आयोजित करण्यात आले आहेत. व्यापारी, डॉक्टर, वकील प्रतिष्ठित नागरिक, माहेश्वरी समाज बांधवांनी आणि नांदेडकरांनी या निदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी केली आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी