लोहा| साहित्यिक तथा प्रयोगशील शिक्षक शिवाजी आंबुलगेकर यांना 'झी' माध्यम समूहाच्या झी २४ तास या वृत्त वाहिनीच्या वतीने दिल्या जाणारा 'अनन्य सन्मान' नुकताच बांद्रा मुंबई येथील 'रंगशारदा' प्रेक्षागृहात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विद्यानिकेतन कमळेवाडी येथे मराठी अध्यापक म्हणून कार्यरत असलेले शिवाजी आंबुलगेकर हे प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळखले जातात.विमुक्त जाती ,भटक्या जमातींच्या मुलांना मराठीचे अध्यापन करताना आलेल्या अडचणींवर मात करण्याच्या उद्देशाने त्यांना अनेक कल्पना सुचल्या.या कल्पनांना त्यांनी शैक्षणिक प्रयोगात परावर्तीत केले.विद्यार्थ्यांसाठी नवनवे उपक्रम योजिले. यातून क्रमिक अभ्यासात अडकून पडलेल्या चौकटी भेदता आल्या.कठीण कठीण वाटणारा अभ्यास सरळ सोपा झाला.
या उपक्रमशीलतेतून 'अनुवादाची आनंदशाळा','माझ्या गावचा भूगोल','श्रावण अभिवाचनमाला','लेखक थेट भेट','विमुक्त भटक्यांची खाद्यसंस्कृती','विमुक्त भटक्यांच्या बोलींचे कोश' असे काही लक्षवेधी प्रयोग आकाराला आले.हे प्रयोग इतर हजारो शाळांसाठी अनुकरणीय आहेत.उपयोगी आहेत.अध्ययन - अध्यापन प्रक्रियेत आनंद निर्माण करणारी क्रांतिकारकता यात दडली आहे; ही बाब विचारात घेऊन आजवर मौनी विद्यापीठ गारगोटीच्या वतीने 'डॉ. जे.पी.नाईक शिक्षक पुरस्कार,राष्ट्रसेवादल पुणे यांच्या वतीने 'साने गुरुजी समाज शिक्षक पुरस्कार','साने गुरुजी कथामाला जालनाच्या वतीने 'साने गुरुजी पुरस्कार','मराठी अभ्यास केंद्र,मुंबईकडून 'जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठीभाषा शिक्षक पुरस्कार तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने 'विशेष शिक्षक पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले आहे.
शिवाजी आंबुलगेकर यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे.'उद्गार वाङ्मय पत्रिका' तसेच 'मायबोली मराठी परिषदे'ची त्यांनी स्थापना केली आहे. त्यांच्या 'तुका म्हणे ऐशा नरा...' या एकांकिकेला महाराष्ट्र शासनाचा 'मामा वरेरकर पुरस्कार लाभला आहे.त्यांनी कविता, कथा, ललित, वैचारिक लेखनही केले आहे.
आंबुलगेकर यांच्या शैक्षणिक व वाङ्मयीन कार्याचा विचार करून 'झी' माध्यम समुहाच्या 'झी २४ तास' या वृत्तवाहिनीच्या वतीने त्यांना मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते,केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आ.भाई जगताप, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील ,झी २४ तासचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.संगीता आणि सुकन्या कांचनसह गौरविण्यात आले.हा सोहळा बांद्रा मुंबई येथील 'रंगशारदा' या प्रेक्षागृहात दिमाखदारपणे पार पडला.