सामाजिक वनीकरण विभागाला भ्रष्टाचाराची वाळवी; हदगांवच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह सहा अधिकारी- कर्मचारी निलंबित -NNL


नांदेड/हदगाव/हिमायतनगर।
संबंध महाराष्ट्रात बहुचर्चित ठरलेल्या भोकरपाठोपाठ हदगांव-हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाकडून केलेल्या वृक्षलागवड व संगोपण कामाच्या गैरव्यवहारात हदगांवच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती आरती पुणसे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वनपाल अण्णासाहेब वडजे,गंगाधर टेकाळे व वनरक्षक कु.मनुका राठोड,राजरत्न साबने,कु.ज्योती कुटे पाटील यांना निलंबित करण्यात आलेले असून याच गैरव्यवहारात यापूर्वी तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक व अतिरिक्त कार्यभारात असलेले येथिल विभागीय वन अधिकारी आशिष हिवरे यांना तसेच, तत्पूर्वी भोकरच्या अधिकारी- कर्मचारी यांनाही निलंबित करण्यात आल्याने या विभागाला जणू भ्रष्टाचाराचीच वाळवी लागल्याचे दिसून येते. पहिल्यांदाच या विभागात कारवाईच्या मालिकांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याने धास्तीनेच या गैरव्यवहारात अडकलेले अनेकजण स्वतःच्या बचावासह क्लीनचिट मिळविण्यासाठी जोमाने प्रयत्न करित असल्याची चर्चा रंगली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील वन व सामाजिक वनीकरण विभागाकडून पर्यावरणसमृद्धीसह जलसिंचन वाढ व अन्य बाबीदृष्टीने विविध योजनांपाठोपाठ गत कांही वर्षात कोटींची उड्डाने घेत महत्वाकांक्षी योजना म्हणून वृक्षलागवडीसह त्यांच्या संगोपनासाठीही कोट्यावधीचा खर्च करण्यात आलेला असतांना मुख्यत्वे नांदेड जिल्ह्यात मात्र तो जणू कागदावरच राहिल्याचा प्रत्यय या प्रकरणाच्या माध्यमातून येत असून नांदेडच्या सामाजिक वनीकरण विभागात बहुतांश परिक्षेत्रात वृक्षलागवडच नसल्याने संगोपन दूरच राहिले मात्र यावरचा खर्च उचलून मात्र संगनमतातून वाटाघाटीत अनेकांनी आर्थिक उंची गाढली आहे.याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीसह वनप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व जागरुक नागरिकांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. अनेक वृत्तपत्रांतून पुराव्यानिशी वृत्तही प्रकाशित झाले परंतु, कुंभकर्णी झोपेच्या सोंगाधीन बनलेल्या या विभागाच्या बहुतांश वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्षच केले होते. अनेकांना आर्थिक वाटेकरी बनवून थंड करतांनाच काहीजण सामाजिक भावनेतून सातत्याने पाठपुरावा करित असल्याने त्यांच्यावरही उपाययोजनांची प्रसंगी दमदाटीही झाली.

तरिही येथिल वनविभाग प्रकरणनिहाय चौकशीसह सद्यातरी कारवाईपासून दूर आहे.मात्र सामाजिक वनीकरण विभाग चांगलाच चर्चेत आला. त्यासाठीचे निमित्त ठरले महाराष्ट्र विधीमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन. वनपरिक्षेत्र व सामाजिक वनीकरण विभागातील वृक्षलागवड व संगोपनाच्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा येथे चा॔गलाच चर्चीत आला अन् सामाजिक वनीकरण विभागातील भोकरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागले.तर,हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील सन् २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षातील कामाची चौकशी लातूर,उस्मानाबाद, जालना व परभणी येथिल सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. या चारही नियुक्त चौकशी पथकप्रमुखांना सहकार्यासाठी वनपरिक्षेत्रातील अन्य चार अधिकारी नियुक्त करण्यात आल्यानंतर त्यांनी प्रारंभी या गंभीर बाबीकडे वेळ मारुन नेत जणू दुर्लक्षच केले काही काळानंतर त्यातील काहींनी चोख कर्तव्य बजावले तर, कांहीनी चौकशीचा फार्सच आळविला.

त्यात भरिस भर देत औरंगाबादच्या वनसंरक्षकांकडून क्षेत्रीय पहाणीच्या गोंडस नावाखाली हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील निवडक कामांची पहाणी करुन त्यांच्या विभागाचे क्षेत्र नसतांनाही नियमबाह्यपणे किनवट तालुक्यातील इस्लापूरमध्ये चांगलाच पाहूणचार घेतला होता.विशेष बाब म्हणजे त्यांचेसमवेत एका चौकशीपथकानेही चालू चौकशीचे कार्यक्षेत्र सोडून याठिकाणी आलेले होते.त्यांच्या या कार्यपद्धतीसह वरिष्ठांनी दिलेल्या विहित कालमर्यादेत चौकशी पथकांकडून चौकशीसह याबाबतचा अहवालाच्या विलंबामूळे हा केवळ चौकशीचा फार्सच असल्याचे जाणवत असल्यानेच या प्रकरणात आम्ही परखडपणे लिखाण केलेले होते. वरिष्ठांकडून प्राप्त आदेशानुसार व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अभिलेखे व दस्तावेज ताब्यात घेऊनच संयुक्त स्थळ पहाणी व तपासणी करणे अत्यावश्यक असले तरिही चारही चौकशी समित्यांनी वेळकाढूपणा करित सोयीनुसारच चौकशी केली होती.

प्रारंभी लातूर व उस्मानाबादच्या विभागीय वन अधिकाऱ्यांकडून विविध कामांची पहाणी व तपासणी करण्यात आली होती तर,कांही दिवसांपूर्वी परभणी येथिल विभागीय वन अधिकाऱ्यांनी औरंगाबादचे प्रभारी वनसंरक्षक अमित मिश्रा या आपल्या वरिष्ठांसह मोजक्याच कामांना भेटी देऊन किनवट तालुक्यातील ईस्लापूर येथे नियमबाह्यपणे पाहूणचार घेऊन भोकरमार्गे नांदेड मुक्कामी येऊन अर्धवट चौकशी करून निघून गेले होते तोच कित्ता गिरवित जालना येथिल विभागीय वन अधिकाऱ्यांनीही मोजक्याच कामांना भेटी दिल्यानंतर त्यांच्याकडे साक्ष व जवाब नोंदविण्यासाठीही संबंधित स्थानिकांनी पाठ फिरवली होती त्यामूळेच या चारही चौकशी पथकांकडून स्थळ पहाणी व तपासणी झाल्याने व भोकरच्या प्रकरणात दोषी असतांनाही निवडक वरिष्ठांची मेहरनजर असलेले आशीष हिवरे हे वरिष्ठ पाठीशी असल्यानेच संबंधित अधिकारी व कर्मचारी आपल्यालाही क्लीनचिट मिळणार असल्याच्या अविर्भावात होते.

परंतू, अचानकपणे लातूर व उस्मानाबाद विभागीय वन अधिकाऱ्यांनी पूनश्च नांदेडात येऊन केलेल्या स्थळ पहाणी व तपासणीबाबत संबंधित स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल यांची साक्ष व जवाब नोंदविली तर,या प्रकरणात अन्य दोन चौकशी पथकप्रमूखांनी अर्धवट चौकशी करुन काढलेला पळ त्यांच्या चांगलाच अंगलट येत असल्याने त्यांनीही पूनश्च नांदेडवारी करुन त्यांच्यासह या चारही चौकशी पथकांकडून विविध कामांची स्थळ पहाणी व तपासणी पूर्ण केली होती. महत्वाचे म्हणजे,या चौकशीच्या कालावधीत ऐन उन्हाळ्यात वृक्षलागवड करण्यात आली सोबतच,दोषी असलेल्या आशीष हिवरे यांना पदावर ठेवूनच त्यांच्या व संबधितांच्या मर्जीप्रमाणेच कामांच्या स्थळ पहाणी व तपासणी करण्याचा प्रयत्न प्रारंभी झाला होता.या प्रकरणात प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवूनच याबाबत आम्ही सातत्याने व परखडपणे लिखाण केलेले होते त्याच अनुषंगाने हिवरे यांच्याकडून विभागीय वन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेत येथील वनविभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांना देण्यात होता परंतू,पडद्यामागून सर्वच सूत्रे हिवरे यांच्याकडे असल्याचे दिसून येत असल्यानेच तेच येथिल कारभारी असल्याचा व वाबळे हे जणू नामधारी बनल्याचाही प्रत्यय यापूर्विही येत होता.

प्रत्येक वरिष्ठांपर्यंत स्वतःचे संगनमत असल्याच्या अविर्भावात त्यांच्याकडून बोलल्या जात असल्याने त्यांच्यासह या प्रकरणातील दोषींविरुद्ध ठोस कारवाई होत नव्हती.त्यातच,भोकर तालुक्यातील अधिकारी- कर्मचारी यांच्यावर कारवाईपूर्वि त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा असतांनाही त्याऐवजी त्यांच्याकडेच येथिल विभागीय वन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने त्यांच्याकडूनच भोकरच्या तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपाल व वनपाल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती. प्रकरणनिहाय तक्रारीत तथ्य असले तरिही हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील कामांच्या चौकशीसह याबाबत अनेक शकल लढविण्यात आल्या त्यात थेट चौकशीवेळी ऐन उन्हाळ्यात वृक्षलागवड करुन दर्जेदार कामे दाखवून सर्वच कामे तपासणीऐवजी निवडक कामांची स्थळ पाहणीतून कागदोपत्रीच चौकशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता.परंतू,चौकशी केलेल्या निवडक कामामध्येही मोठा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट नमूद करुनच चारही नियुक्त चौकशी पथकांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात दोषींविरुद्ध कारवाईची मालिका सुरु झालेली आहे.

या प्रकरणात आपल्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होणार नसल्याच्या अविर्भावात असतांनाच तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक व अतिरिक्त कार्यभार असलेले विभागीय वन अधिकारी आशिष हिवरे यांच्यावर राज्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या पूणे येथिल प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ.सुनिता सिंग यांनी नुकतीच निलंबनाची कारवाई केल्याने अनेक दोषींविरुद्ध कारवाई होणार असल्याचे निश्चित झालेले होते.परंतू,हिवरे यांना प्रकरणात तातडीने क्लीनचिट मिळावी यासाठी वरिष्ठांकडून आदेश असतांनाही काहीजण अन्य दोषींच्या बचावासाठी प्रयत्नशील होते.त्यामूळेच या प्रकरणात अनेकांवर कारवाई होणे अपेक्षित असतांनाही सध्यातरी कार्यरत अधिकारी- कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

हदगांवच्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती आरती नामदेव पुणसे यांच्यावर संपूर्ण प्रकरणात कामाच्या गुणवत्तेत व परिमाण राखण्याच्या बाबतीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आल्याने तसेच,जाणीवपूर्वक गैरव्यवहार आणि कामाचे परिमाण कमी दाखविले असतांना संपूर्ण कामावर प्रस्तावित रक्कम खर्ची घालून शासकीय रक्कमेचा संगनमताने अपहार झाल्याचे निदर्शनास येते आणि ज्याअर्थी चौकशी अहवालात कामे न झाल्याचे निष्पन्न झाल्यावर नव्याने अवकाळी म्हणजे उन्हाळ्यात रोपे लावून चौकशी समितीची दिशाभूल करुन प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवून औरंगाबाद येथिल सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

क्षेत्रीय कामांमध्ये कर्तव्य परायणता न ठेवणे,नितांत सचोटी न राखणे, हेतूपरस्पर कर्तव्यामध्ये कसूर करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करणे, स्वतःचा आर्थिक लाभ करुन घेण्याच्या हेतूने कोणत्याही आर्थिक किंवा ईतर आवबंधनामध्ये गुंतवून घेणे, नागरी सेवक म्हणून पदांचा गैरवापर करुन आर्थिक लाभ मिळविणे आदी विविध गंभीर स्वरुपाच्या अनियमितता आढळून आल्याने सामाजिक वनीकरण विभागातील हदगांव येथिल वनपाल अण्णासाहेब देविदास वडजे,गंगाधर पुरभाजी टेकाळे यांच्यासह वनरक्षक कु.मनुका गणेश राठोड,राजरत्न कोंडिबा साबणे,कु.ज्योती ज्ञानोबाराव कुटे पाटील यांना निलंबित करण्यात आलेले असून, येथिल सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांच्याकडून संबधितांवर सदरची निलंबन कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान निलंबित करण्यात आलेल्या हदगांव कार्यालयातील दोन वनपालासह तिन्ही वनरक्षकांना निलंबन कालावधीत वनपरिक्षेत्र अधिकारी (सा.व.), नांदेड हे मुख्यालय देण्यात आलेले असून याबाबतही तर्कवितर्क लढविले जात आहेत.

अनेक दोषींविरुद्ध कारवाईची टांगती तलवार !
महत्वाचे म्हणजे या प्रकरणात हदगांव-हिमायतनगर तालुक्यातील तत्कालीन अनेक अधिकारी-कर्मचारी क्लीनचिट मिळविण्यासाठी चांगलेच प्रयत्नरत बनल्याचे बोलल्या जात असले तरिही याच प्रकरणात कांही वरिष्ठांचेही हात गुंतलेले असल्याने त्यांच्याकडूनही बचावात्मक पावित्रा घेण्यात येत आहे. या प्रकरणातील प्राप्त चौकशी अहवालात आढळून आलेल्या सर्वच दोषींविरुद्ध लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबत नांदेड न्यूज लाईव्हने सतत पाठपुरावा केल्यामुळे वृक्ष लागवड कार्यक्रमात भ्रष्टाचार करून गलेलठ्ठ झालेल्या अधिकारी व काही स्वार्थी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही झाली. तर काहींवर निलंबनची टांगती तलवार दिसते आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी