नांदेड| गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल नांदेड येथील लेखक डॉ. विलास ढवळे आणि त्यांच्या पत्नी प्रमिला यांना दुबई येथे 'जीवन गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. रत्नधाव फाउंडेशन, महालँड ग्रुप आणि दुबई येथील सफर संस्थेच्यावतीने हा पुरस्कार बहाल करण्यात आला. दुबईतील मीडिया सिटीतील पंचतारांकित मीडिया रोटाना हॉटेलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील काही व्यक्तींची 'जीवन गौरव' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. दुबई येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात दुबईच्या रॉयल ऑफिसमधील मिस नाहेद, ग्लोबल ॲम्बेसिडर लैला रहाल, वित्त विभागाचे संचालक अमित लखन पाल उर्फ मोहम्मद अली, सफर ग्रुपचे संचालक अब्दुल अजिज अहमद, यशदा पुणे येथील अधिकारी डॉ.बबन जोगदंड, महालँड ग्रपचे प्रमुख अॅडवोकेट पंडित राठोड, रत्नधाव फाऊंडेशनचे प्रमुख चेतन बंडेवार व राहुल भातकुले यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विशेष काम करणाऱ्या ३३ व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दुबई आणि महाराष्ट्र व भारताचे संबंध अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून अधिक दृढ होतील असे मत ग्लोबल अँबेसिडर लैला राहाल यांनी व्यक्त केले. प्रारंभी महालँड ग्रुपचे प्रमुख अॅड. पंडित यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विलास ढवळे यांनी प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी मौलिक संशोधन केले आहे. विविध राष्ट्रीय परिषदा, राज्यस्तरावरील संहिता लेखन कार्यशाळांमध्ये सहभागाबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ते माध्यम तज्ञ म्हणून परिचित आहेत. त्यांच्या पत्नी प्रमिला यांनी संवाद व सहजीवन यावर काम केले आहे.