२५ एप्रिल रोजी वाढोण्याच्या इच्छापूर्ती श्री वरद विनायक आणि श्री कनकेश्वर महादेव मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन -NNL

त्यानिमित्ताने रविवारी शहरातील मुख्य रस्त्याने निघेल कलशाची भव्य मिरवणूक 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
हिमायतनगर (वाढोणा) शहराजवळ असलेल्या पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक आणि श्री कनकेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराची निमित्ती होऊन अनेक वर्ष लोटली मात्र मंदिरावर कळस बसविण्याचा मुहूर्त लागला नव्हता. या मंदिराच्या कळस रोहणाचा मुहूर्त बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, दत्त संस्थान पिंपळगावकर आणि संतश्री देवगिरी गुरु आनंदगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दि.२५ एप्रिल रोजी साधल्या गेला आहे. तत्पूर्वी दि.२४ रोजी गावातील मुख्य रस्त्याने भव्य कलश मिरवणूक काढण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तानी उपस्थित होऊन दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन वाढोणा वासियांच्या वतीने करण्यात आले आहे.   

वाढोणा शहराच्या पश्चिमेस हाकेच्या अंतरावर निसर्ग निर्मित्त पांडवकालीन युगातील कनकेश्वर तलाव आहे. सध्याच्या हिमायतनगर शहराचे नाव त्याकाळी वारणावती होते. पांडवानी या तलावाला ओमचा आकार दिला आणि द्रोपदीने तलावात शुभ्र कमळाचे फुलं लाऊन मंदिर परिसराला सजविल्याची अख्याइका सांगितली जाते. याचं पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती वरद विनायक गणपतीचे मंदिर चंद्राच्या बिंबावर वसलेले आहे. कालांतराने या ठिकाणी गौंड राज्याचे राज्य अस्तित्वात आले, त्या राजाने वारणावती शहराचे नाव बदलून वाढोणा ठेवले. राजे शामबहादूर यांनी वाढोणा शहराला जिल्ह्याचा दर्जा दिला होता. ते याच ठिकाणी राहून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहत शेतसारा वसूल करत असे. कालांतराने निजामशाही राजवटी सुरु झाली. त्या काळात हिमायतअली नावाचा सरदार वाढोणा जिल्ह्याला भेट देण्यासाठी आला होता. सर्व जाती - धर्माच्या लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावर खुश होऊन हिमायतअली राजाने हिंदू - मुस्लिम समाजासाठी शेतीच्या स्वरूपात भव्य नजराणा बहाल केला. सरदार च्या उपकाराची परतफेड म्हणून हिमायतअली नावाचे नामांतर करून वाढोणा शहराला हिमायतनगर नाव देण्यात आले. तेंव्हाच वाढोणा आज हिमायतनगर नावाने ओळखले जाते आहे. 

निजामाच्या राजवटीत या तलवानजीक असलेल्या शिवमंदिरासह अन्य मंदिराची सुरक्षा धोक्यात आली होती. त्या पासून मूर्तीचे रक्षण करण्यासठी येथील काही लोकांनी वरद विनायकाची मूर्ती लिंबाच्या झाडा खालील कंबरे इतक्या खोल खड्यात जपून ठेवली होती. तीच वरद विनायकाची मूर्ती तब्बल दीडशे वर्षानंतर याच अवस्थेत उन, वारा, पावसाचा अनुभव घेत राहिली. सण १९७८ ला तत्कालीन अवतारी पुरुष श्री संत पाचलेगावकर महाराज यांनी हिमायतनगर शहराला भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कनकेश्वर तलावासह मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. त्यावेळी गावातील गणेशभक्त व परिसरातील शेतकर्यांनी श्रमदान केले. संकल्प पूर्ण करण्यासाठी २५ वर्षानंतर नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन बांधकाम सभापती श्री प्रताप देशमुख सरसमकर यांच्या सहकार्याने गुरुवर्य लाखने महाराज, कांतागुरु आजेगावकर, यांच्या पुढाकारातून मंदिर बांधकामाची सुरुवात करण्यात आली होती. यासाठी येथील छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या युवकांनी गणेशोत्सव काळात केला जाणारा अनधिकृत खर्च टाळून उर्वरित रक्कम, लोकवर्गणी व मजुरीचे पैसे वाचवत वरद विनायकाचे मंदिर उभे केले. उंच टेकडीवरील मंदिरात अष्टभुजाधारी इच्छापूर्ती वरद विनायकाची विशाल मूर्ती मोठ्या कसोटीने नेण्यात येउन, विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. आज हि मूर्ती सर्वाना आशीर्वाद देत असून, गणेश उत्सव पर्व काळात या ठिकाणी गणेश मूर्तीची पूजा- अर्चना महाभिषेक, महाप्रसादाच्या पंगती केल्या जातात. 

त्या वरद विनायक मंदिराच्या समोर कनकेश्वर महादेवाचे मंदिर उभे झाले, महादेव भक्त भास्कर चिंतावर यांच्या पुढाकारातून कनकेश्वर महादेवाची मूर्ती बसविण्यासाठी योगदान दिले. याचा दोन्ही मंदिराच्या कलशारोहण कधी होणार याची प्रतीक्षा भाविक- भक्तांना होती. यासाठी शान्तीलाल सेठ श्रीश्रीमाळ व भास्कर चिंतावार, आदींसह त्यांचे सहकारी आणि शहरातील गणेशभक्त देणगीदारांची सहकार्यातून दि.२४ एप्रिल मिती चैत्र कृष्ण दशमी, शके १९४४ रोज सोमवारी श्री कनकेश्वर महादेव मंदिर आणि श्री वरद विनायक गणपती मंदिराचा कलशारोहन सोहळा आयोजित केला आहे. 

तर मिती चैत्र कृष्ण नवमी दि.2४ रविवारी सकाळी ७ वाजता कलशाची भव्य मिरवणूक महिला- पुरुष भाविक- भक्तांच्या सहभागातून शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात येणार आहे. दि.२५ सोमवारी सकाळी ११ वाजता कलशारोहन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, दत्त संस्थान पिंपळगाव, संतश्री देवगिरी गुरु आनंदगिरी महाराज, दत्त संस्थान दिघी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्याहून पाचारण करण्यात आलेल्या पुरोहित आणि हिमायतनगर येथील पुरोहिताच्या मंत्रोचार वाणीत मान्यवर दाम्पत्यांच्या हस्ते होम-हवन, पूजाविधी आणि महाआरती होऊन कलशारोहन आणि त्यानंतर भव्य महाप्रसादाचे वितरण होणार आहे.   

अंगारिका चतुर्थीला हजारो भाविकांनी घेतले वरद विनायकाचे दर्शन 


हिमायतनगर येथील इच्छापूर्ती वरद विनायकाच्या दर्शनासाठी अंगारिका चतुर्थी निमित्ताने महिला- पुरुष भाविक भक्तानी मोठी गर्दी केली होती. कारण आज गणेशभक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. त्यातही मंगळवारी चतुर्थी तिथी आल्यावर त्याला अंगारकी चतुर्थीचा म्हणतात म्हणून ही चतुर्थी अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाते. हिंदू परंपरेनुसार चतुर्थी महिन्यात दोनदा येते. भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला होता, म्हणून ही तिथी गणेशाला समर्पित आहे. अमावस्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर येणार्‍या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. जर चतुर्थी तिथी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. 

यावेळी अंगारकी चतुर्थी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या तारखेला म्हणजेच आज 19 एप्रिल 2022 रोजी आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते असे मानले जाते. गणेशाच्या या रूपाला 'संकटमोचन गणेश' म्हणतात. मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते, त्यावर प्रसन्न होऊन गणरायाने जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल, त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाईल, असे वरदान दिले होते. त्यामुळे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतात. म्हणून आजच्या दिनी अनेक भाविकांनी सपत्नीक वरद विनायकाचे दर्शन घेतले तसेच अनेकांनी मनोकामना करत गणपतीला अभिषेक केला.

चतुर्थी तिथी प्रारंभ : मंगळवार, 19 एप्रिल, संध्याकाळी 04:38 वाजता

चतुर्थी तिथी समप्ती : 20 एप्रिल बुधवारी दुपारी 01:54 वाजता

चंद्रोदयाची वेळ : 19 एप्रिल रात्री 09:50 वाजता

अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:54 ते दुपारी 12:46 वाजेपर्यंत

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी