कंत्राटी ग्रामसेवकासह दोषींविरुद्ध कारवाईसाठी जिल्हापरिषदेसमोर किरण वाघमारे यांचे उपोषण सुरु
नांदेड। नायगांव तालुक्यातील औराळा येथे गांव विकासासाठीच्या मंजूर कामे कागदोपत्रीच पूर्ण करीत याबाबतचा निधी खर्च दाखवितानाच स्थानिक उपसरपंच सौ.रेखा साईनाथ पांढरे यांच्या कुटूंबात वैयक्तिक लाभांच्या विविध योजना अनेकदा नियमबाह्यपणे यापूर्वी दिल्या प्रकरणाची चौकशी प्रलंबित असतांना पूनश्च त्यांच्या पतीच्या नावे शौचालय बांधकाम व वापर अनुदान कंत्राटी ग्रामसेवक आर.जी. मुदखेडे यांनी मंजूर केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाल्याने पुराव्यानिशी तक्रार करुन दोषींवर कायदेशीर करावी वा यासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आज जि.प.नांदेड कार्यालयासमोर माहिती अधिकार कार्यकर्ते किरण वाघमारे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली असून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागासह गटविकास अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली.
सविस्तर वृत्त असे की, ग्रा.पं.औराळा येथील पदभार स्वीकारल्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक आर.जी.मुदखेडे यांनी आपल्या कार्यकाळात जनतेच्या मूलभूत गरजा पूर्णत्वास नेण्याच्यादृष्टीने गांव विकासासाठी शासनाकडून मंजूर काही कामे हस्तकांकडून दर्जाहीन स्वरुपाची तर,बहुतांश कामे कागदोपत्रीच पूर्ण दाखवून याबाबतचा निधी उचलून खर्च केला.सोबतच,वैयक्तिक लाभांच्या योजना एकाच कुटूंबातील व्यक्तींना (बनावट कागदपत्रांतून विभक्त कुटुंब असल्याचे दाखवून )अनेकदा दिलेल्या आहेत.विशेष म्हणजे उपसरपंच सौ.रेखा साईनाथ पांढरे यांचे एकत्रित कुटूंब असतांनाही ते विभक्त असल्याचे दाखवून साईनाथ गंगाधर पांढरे, गंगाधर हणमंत पांढरे व आनंदा गंगाधर पांढरे या तिघांनी स्वतःकडे जनावरे नसतांनाही मग्रारोहयो/मनरेगा योजनेतून जनावरांचा गोठा तसेच, शौचालय बांधकाम व वापर अनुदान याबाबतचा निधी यापूर्वी कागदोपत्रीच काम पूर्ण दाखवून उचल केल्याबाबतची चौकशीसह त्यांच्यावर कारवाई प्रलंबित असतांनाच उपसरपंच पतीच्या नांवे पूनश्च दुबार शौचालय बांधकाम व वापर अनुदान मंजूर करुन घेतले आहे.
याबाबत माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती प्राप्त करुन घेऊन सदरच्या दोन्ही स्वतंत्र प्रकरणात दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी विनंतीनंतर पांढरे कुटूंबिया विरोधातील प्रकरणात अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मनरेगा विभागाचे उप जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांना पुनश्च स्मरणपञ दोन नुसार कार्यवाहीचे आदेश दिले होते. तर,कंत्राटी ग्रामसेवक आर.जी. मुदखेडे यांच्याबाबत चौकशीसह कार्यवाहीबाबत जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी व नायगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना आदेशीत केले होते. गटविकास अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून चौकशीचा फार्स चालविला.परंतू, संबधित दोन्ही अधिकारी स्वतः वा वरिष्ठांच्या आदेशानंतरही कार्यवाही करणे टाळून दोषींना पाठीशी घालीत असल्याचा आरोप उपोषणकर्ते वाघमारे यांनी केला आहे.
दरम्यान माहिती अधिकारातून संबधित विभागाकडूनच माहिती घेऊन पुराव्यानिशी तक्रारीनंतर प्रशासन दोषींना पाठीशी घालीत असल्याने या दोन्ही प्रकरणात दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी वा याबाबत वरिष्ठांसह मा.सक्षम न्यायालयात दाद मागण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी वाघमारे यांनी केल्याने जिल्हा परिषद प्रशासन चांगलेच कायद्याच्या कचाट्यात सापडले असून या दोन्ही प्रकरणात दोषींसह त्यांची पाठराखण करणाऱ्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लवकरच ठोस कारवाई होणार असल्याची कुजबूज आज नांदेड जिल्हा परिषद परिसरात ऐकावयास मिळाली.