महाराष्ट्राचे आधुनिक भगिरथ, निष्कलंक चारित्र्याचे महामेरू डॉ. शंकररावजी चव्हाण यांचा जनसेवेचा राजकीय वारसा घेऊन लोकनेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आ. अशोकरावजी चव्हाण हे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. राजकीय सत्ता ही स्वत:च्या मौजेसाठी नाही, तर ती उपेक्षित, वंचितांच्या कल्याणासाठी असते हा डॉ. शंकररावजी चव्हाण यांचा विचार ते निष्ठेने जपतात. 28 ऑक्टोबर 1958 रोजी मुंबई येथे अशोकरावजी चव्हाण यांचा जन्म झाला.
वडिलांच्या नि:स्वार्थ सेवेच्या राजकारणाची आणि मातोश्री कुसुमताई चव्हाण यांच्या प्रेमळ संस्कारांची शिदोरी त्यांच्या सोबत आहे. केवळ वाड-वडिलांच्या पुण्याईवरच सदा-सर्वकाळ राजकारणात यशस्वी होता येत नाही, त्यासाठी स्वकर्तृत्वाची उंची असावी लागते, हे अशोकरावजी चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वकर्तृत्वाने दाखवून दिले आहे. म्हणून 1952 ते आजतागायत चव्हाण कुटुंबीय राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहे.
युवक काँग्रेसपासून आपल्या राजकीय जीवनाला सुरूवात करणारे आ.अशोकरावजी चव्हाण हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. 2008 ला महाराष्ट्र काहीसा अडचणीत असताना त्यांच्याकडे महाराष्ट्राचे नेतृत्व आले. 2008 ला त्यांना मुख्यमंत्री म्हणून अतिशय अल्पकाळ मिळाला. पण मिळालेल्या अल्पकार्यकाळातील क्षण नि क्षण महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी खर्च केला. 2009 ची विधानसभा निवडणूक अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. त्यात काँग्रेस पक्षाला निर्विवाद यश मिळाले आणि मा. चव्हाण पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. खरे तर त्यांना मुख्यमंत्री म्हणून पूर्ण टर्म मिळाली असती, तर नांदेड, मराठवाडा आणि महाराष्ट्राचा कायापालट झाला असता.
गुरूतागद्दीच्या माध्यमातून नांदेडचा विकास व मुख्यमंत्री पदावर असताना गरीब रूग्णांसाठी राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना राज्यात लागू करून मोठे कार्य त्यांनी केले आहे. महिलांसाठी मंत्रालयात स्वतंत्र रांग, खेळाडूंचा प्रोत्साहनपर पुरस्कार, कलावंताच्या मानधनात वाढ, शेतकर्यांना नुकसान भरपाई, कामगारांना काम यासह मोठ्या प्रमाणात शेतकर्यांची कर्जमाफी ही त्यांची कामगीरी ऐतिहासिक ठरली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी राजा आहे असे ते मानतात. दुसरी विशेष महत्वाची व उल्लेखनीय बाब म्हणजे बहुजनांच्या मुला-मुलींना शिक्षणाची संधी मिळत नाही म्हणून श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा दारात आणली, मग ती भाऊराव चव्हाण महाविद्यालय असो की, अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालय असो की मुदखेड मधील राजीव गांधी महाविद्यालय असो. यशवंत कॉलेजमध्ये यशवंत पॅटर्न ही त्यांचीच संकल्पना. म.फुले हायस्कूल,सावित्रीबाई फुले, हायस्कुल, शारदा भवन हायस्कूल या वटवृक्षाखाली ज्ञानाचाअखंड यज्ञ चालू आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या व महाराष्ट्राच्याही राजकीय नकाशावर नांदेडचे नाव चव्हाण पिता-पुत्र्यामुळेच आदराने घेतल्या जाते.लोकाभिमुख, सर्व धर्म समभाव मानणारे, कर्तव्यदक्ष, प्रजाहित रक्षक, राजकारणातील दीपस्तंभ तथा सुसंस्कृत नेतृत्व अशोकरावजी चव्हाण यांना आरोग्यदायी दिर्घायुष्य लाभो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना !
....रूपेश पाडमुख,संपादक, दै.समीक्षा नांदेड, मो.9422173735