नांदेड| येथील ख्यातनाम साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, बहुजनांची मुलुख मैदानी बुलंद तोफ, अन्याय - अत्याचार - भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ मान्यवर इंजिनिअर चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्रचा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
महात्मा जोतीराव फुले शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने रविवार दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे भव्य शिक्षण परिषद व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. भाऊसाहेब इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांनाही या कार्यक्रमात समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
इंजि. चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर हे सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता असून महापारेषण विद्युत कंपनी, नांदेड येथून ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. अखिल भारतीय बहुजन समता परिषदेचे ते संस्थापक असून नॅशनल भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे राष्ट्रीय महासचिव आहेत. राष्ट्रीय गुरु रविदास समता परिषदेच्या मुख्य राष्ट्रीय संघटकपदी त्यांची नुकतीच सोलापूर येथे निवड जाहिर झाली आहे.
अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे ते आयोजन करीत असतात.हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या भाऊसाहेब इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची राज्यस्तरीय पुरस्कारसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यक्रमास सर्व क्षेत्रांतील समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.