नांदेड| स्वयंसहायता समूहातील महिला उद्योजिका यांनी कर्ज देणे, घेणे इथपर्यंतच सिमित न रहता उत्कृष्ट उत्पादने तयार करून त्यांचे ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंग या माध्यमातून शाश्वत उपजीविका निर्माण करुन जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नांदेड व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहातील महिला उद्योजिका व उमेद-MSRLM स्टाफ यांचे समूह मार्फत उत्पादित होणाऱ्या मालांचे ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंग या विषयावर जिल्हास्तरीय मूलभूत प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, राज्य प्रशिक्षक सारिका लोहाना, गजानन पातेवार, योगेश जोशी, गणेश वर्मा, धनंजय भिसे, डी. व्ही. राठोड, गणेश कवडेवार आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले म्हणाले, ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांनी मार्केटच्या गरजेनुसार दर्जेदार उत्पादन तयार केल्यानंतर त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रशिक्षक सारिका लोहाना यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसहायता समूहातील महिला उद्योजिका यांची उपस्थिती होती.