मुंबई/नांदेड/धर्माबाद। बिलोली तालुक्यातील पिंपळगाव (कुं)येथील संतोष प्रकाश पाटील साखरे यांनी नुकतेच मुंबई येथील राजभवन या निवासस्थानी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली.
राजभवनातील कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक घेण्यात आली यावेळी यिन केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील ठराविक प्रतिनिधी उपस्थित होते.या बैठकीत राज्यपाल महोदयांना यिनबाबत संपूर्ण माहिती मंत्र्यांनी दिली त्याचबरोबर येत्या काळात जलसंपदा खात्याच्या वतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करु असे मनोगत व्यक्त केले. यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की एक कार्यकर्ताच मोठा नेता होऊ शकतो आणि त्याचबरोबर यिन च्या सर्व मंत्रीमंडळातील पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयात असताना आपण महासचिव म्हणून निवडून आलो होतो याची आठवण सांगताना समाज कार्याची आवड व अंतःप्रेरणा असल्यास हाती घेतलेले कार्य अधिक चांगले होते, ते म्हणाले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्यावेळी आपल्याला वाईट वाटते असे नमूद करून 'यिन' सदस्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना जगण्याची उमेद दिली पाहिजे, अशी सूचनाही राज्यपालांनी केली.
धर्माबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला ग्रामीण भागातील तरुण राज्याचे महामहिम राज्यपाल यांची भेट घेतो व बैठकीत व्यक्त करतो ही बाब निश्चितच अभिमानाची आहे या यशाबद्दल लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील पदाधिकारी तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांनी संतोष पाटील साखरे यांचे अभिनंदन केले.