वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं लिहिलं
नांदेड| शहरापासून जवळच असलेल्या मौजे विष्णुपुरी येथील श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीई मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी वाडा येथील गीता कल्याण कदम (२१) या विद्यार्थिनीने बुधवारी दि.२१ सप्टेंबर च्या रात्री अभ्यासिका कक्षात दार लावून घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली असून, वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर तिने आराेप केले आहेत. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर असे कि, उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी वाडा येथील विद्यार्थिनी गीता ही २०२० पासून नांदेड येथे शिक्षणासाठी राहते आहे. तिच्या वर्गातील विद्यार्थी आदेश चौधरी त्रास देत असल्याने ती मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात हाेती. यासंदर्भात तिचा भाऊ ज्ञानेश्वरने पाेलिसांत फिर्याद देखील दिली. त्यानंतर ज्ञानेश्वर कदम यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुआईड नोटमध्ये फोटोवरून ब्लॅकमेल केल्याचा उल्लेख असून, त्यात “मी गीता कल्याण कदम. मी आत्महत्या करत आहे. याचे कारण फक्त आणि फक्त आदेश चौधरी हा विद्यार्थी आहे. त्याने मला मी सेकंड इयरला असल्यापासून खूप त्रास दिला. माझं सगळ्यांशी बोलणं तोडलं. तो म्हणेल तेच मी करायचे, फोटोवरून तो मला ब्लॅकमेलही करायचा, घरी सांगतो म्हणायचा. मग तो म्हणेल ते मी करायचे. यामुळे मला मोठा धक्का पोहोचला. मी मनातून खूप खचले. त्यातून बाहेर येण्यासाठी मला गोळ्या घ्याव्या लागल्या. तरी पण मी बाहेर नाही येऊ शकले.
या काळात वैभव क्षीरसागर या माझ्या मित्राने मला यातून बाहेर येण्यासाठी खूप मदत केली. पण मी नाही येऊ शकले. मला झालेला त्रास आठवून खूप त्रास होतो. तो आता मी सहन नाही करू शकत, म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. महिला आयोगाला माझी विनंती आहे की, जे असे समाजातील महिलांच्या हळवेपणाचा फायदा घेतात त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. आदेश चौधरीला तर फाशीची शिक्षा द्या, प्लीज. त्याच्यामुळे आज मी मरून जात आहे. मी मरण्यामागे आदेश चौधरी याचा दोष आहे.’ गीताच्या सुसाइड नोटमध्ये वरील बाबींचा उल्लेख असल्याचे मोठा भाऊ ज्ञानेश्वर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
गीता ऑगस्ट महिन्यात तिच्या गावाकडे गेली होती. तेव्हा तिने हा प्रकार तिचा भाऊ ज्ञानेश्वरला कदम यांना सांगितला हाेता. तिच्या घरच्यांनी तिला समजावून सांगून त्याच्याकडे लक्ष देऊ नको, अभ्यासाकडे लक्ष देण्याचे सांगितले होते. यापूर्वी जर महाविद्यालयातील संचालक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी या प्रकारावर लक्ष ठेवून हा प्रकार वेळीच रोखला असता तर माझ्या बहिणीने आत्महत्या केली नसती. तरी महाविद्यालय प्रशासनाची चौकशी व्हावी, असे मृत गीताचा भाऊ ज्ञानेश्वर कदम यांनी फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण्ड व त्यांच्या सहकार्यांनी हेत देऊन घटनेचा पंचनामा केला आहे.