श्री विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तनावर आणलेली बंदी, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम -NNL

‘भजन-कीर्तनाचा त्रास होतो’ म्हणणार्‍या अधिकार्‍यांना मंदिर समितीतून हाकला ! - हिंदु जनजागृती समितीची मागणी


पंढरपूर/मुंबई|
अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात प्रतीदिन हजारो भाविक येऊन विठुरायाच्या केवळ दर्शनाने आपल्या भक्तीची भूक भागवतात. या धार्मिक नगरीत परंपरागत विठुरायाचा गजर भजन, कीर्तन, नामजप आदींच्या माध्यमातून त्याची भक्ती करतात. असे असतांना मंदिराचे सरकारनियुक्त कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मनमानी पद्धतीने मंदिरातील भजन, कीर्तन आणि नामजप यांवर तडकाफडकी बंदी आणली. 

ही कृती अवघ्या विठ्ठलभक्तांच्या भावना दुखावणारी असून हिंदु जनजागृती समिती या निर्णयाचा तीव्र निषेध करते. हा निर्णय घेण्यामागे ‘सभामंडपात मंदिर समितीचे कार्यालय असल्याने कामकाज करताना भजन-कीर्तनाचा त्रास होतो’ असे संतापजनक कारण देण्यात आले. मंदिराच्या देवनिधीतून मिळणारा पगार घेणार्‍या, मात्र धार्मिक परंपरांविषयी आदर नसणार्‍या आणि या परंपरा बंद करायला निघालेल्या अशा अधिकार्‍यांना मंदिर समितीतून हाकलायला हवे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. या मागणीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूरचे उप-जिल्हाधिकारी श्री. विठ्ठल उदगले यांच्याकडे दिले. या वेळी सर्वश्री. बाबू ढगे, मोहन क्षीरसागर, विष्णू जोशी हे उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे या वेळी म्हणाले की, मंदिराच्या सुव्यवस्थापनासाठी देवस्थान समितीचे कार्यालय आहे कि कार्यालयाच्या सोयीसाठी मंदिर आहे ? जर समितीच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांना भजन-कीर्तनाचा त्रास होत असेल, तर त्यांनी मंदिराबाहेर त्यांचे कार्यालय थाटावे. वर्षभर दिवसातून पाच वेळा कर्णकर्क्कश्य आवाजात वाजणार्‍या मशिदींवरील भोंगाच्या आवाजामुळे कधी शासकीय कर्मचार्‍यांना त्रास होत नाही; त्यासाठी मशिदींवरील भोंगे बंद करा, अशी मागणी कधी करत नाहीत, मात्र त्यांना भजन कीर्तनाचा त्रास होतो. हे अत्यंत वेदनादायी आहे. असे अधिकारी धार्मिक गोष्टींचा आदर ठेवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना समितीतून हाकलून लावायला हवे.

भजन-कीर्तन बंद करण्यामागील मंदिर समितीच्या अधिकार्‍यांनी सांगितलेली अन्य कारणेही चुकीची आहेत. या वेळी शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी म्हणाले की, मंदिर समितीने यापूर्वी मंदिराला दान मिळालेले गोधन कसायांना विकले; दान मिळालेल्या दागिन्यांच्या मोजमापात घोटाळा केला, दागिने गहाळ केले; दान मिळालेली शेकडो एकर भूमी गहाळ केली; दान मिळालेल्या निधीच्या नोंदी-पावतीपुस्तके नीट ठेवली नाहीत आदी अनेक भ्रष्टाचार करून देवनिधीची लूट करण्याचे महापापच केले आहे. तरी ही विठ्ठलद्रोही मंदिर समिती बरखास्त करावी, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना तत्काळ बडतर्फ करावे आणि श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर सरकारीकरणमुक्त करावे, अशा मागण्याही केल्या.

या संदर्भात अंबेजोगाई येथील उप-विभागीय अधिकारी श्री शरद झाडके यांना, तर सांगोला येथे निवासी नायब तहसिलदार श्री. किशोर बडवे यांनाही निवेदन देण्यात आले. अंबेजोगाई येथे ह.भ.प. डॉ. रंगनाथ गर्जाले, अमोल घोडक, बालाजी बारस्कर; तर सांगोला येथे सर्वश्री संतोष पाटणे, गणपत पटेल, कैलास राणावत, डॉ. मानस कमलापूरकर, अतुल चव्हाण, सागर मोहिते, गणेश सुरवसे, अक्षय क्षीरसागर, लक्ष्मीकांत पाचंगे, सागर माळी, महेश चौधरी आदी उपस्थित होते.

श्री. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : 7020383264)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी