मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी नवीन आणि नूतनीकरण अर्ज प्रक्रिया सुरू -NNL


मुंबई|
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन (fresh) आणि नूतनीकरण (Renewal) अर्जाची ऑनलाईन स्वीकृती २२ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या शैक्षणिक व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या प्रत्यक्ष बैठका घेऊन वेळापत्रकानुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाकडून दिले आहेत. 

सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून "महाडीबीटी पोर्टल" या प्रणालीद्वारे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज मॅट्रीकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यवसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता (विद्यावेतन) इत्यादी योजना राबविण्यात येतात. या शैक्षणिक वर्षापासून महाडीबीटी पोर्टलवरून प्रामुख्याने भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत प्रतिवर्षीची अर्ज संख्या लक्षात घेता तसेच या योजनेबाबत केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणीकृत होणाऱ्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करून हे अर्ज विहीत वेळेत निकाली काढणे आवश्यक आहे.

कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीसाठी प्राप्त नवीन अर्ज दिनांक 8 ऑक्टोबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 15 ऑक्टोबर, 2022 पर्यंत करावी.  तर नूतनीकरण अर्जाची महाविद्यालयांसाठी मुदत 15 ऑक्टोबर, 2022 असून सहायक आयुक्तांसाठी 22 ऑक्टोबर पर्यंत कार्यवाही करावी.

वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज दिनांक 20 ऑक्टोबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत. संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत करावी. नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 15 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 31 ऑक्टोबर ही असेल.

वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले नवीन अर्ज दिनांक07 नोव्हेंबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत करावी. नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 31 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 07 नोव्हेंबर, 2022 ही असेल, असे समाजकल्याण विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी