शिक्षण क्षेत्रात ठराविक क्लासेसमध्ये प्रवेशासाठी नेमले जात आहेत खाजगी एजंट ?
एजंट साधत आहेत अकरावी,बारावी साठी प्रवेश घेऊ ईच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांना थेट संपर्क ..
नांदेड/लातूर। मागील दोन दशकांपासून नांदेड व लातूर शहराने देशातील महत्वपूर्ण शैक्षणिक केंद्र म्हणून आपल्या गुणवत्तेचा ठसा संपूर्ण देशपातळीवर उमटवला आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे येथून नीट व आयआयटी सारख्या परिक्षांसाठी येणारे वर्षानुवर्षीचे सातत्यपूर्ण असे एकापेक्षा एक सरस निकाल व त्याबळावर मिळणारे उत्कृष्ट कॉलेजमधील मेडीकल आणि इंजिनिअरींगसाठीचे हमखास प्रवेश या कारणाने येथील विद्यार्थ्यांचा वाढता ओघ लक्षात घेता देशभरातीलअनेक कोंचिग क्लासेसनेही आपल्या शाखा नांदेडात सुरू करून या स्पर्धेत उडी घेतली आहे.
पण अलिकडच्या काळात शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे काही अपप्रवृतीनींही शिरकाव केल्याचे दिसून येते आणि शिक्षणाचे झालेले व्यावसायीकरण आणि त्यात भरडल्या जातोय सामान्य वर्ग , मागील महीन्यात नुकतीच मेडीकल प्रवेशासाठी नीट-२०२२ ही परिक्षा पार पडली असून त्यातील कमी गुण मिळण्याची शक्यता असलेल्या विद्यार्थ्यांनी नीट रिपीटर्स साठी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
पण यामध्ये चर्चा आहे ती नांदेड-लातूर येथील मेडीकल पुर्व प्रवेश परिक्षेची तयारी करून घेणाऱ्या क्लासेस समोर अनेक खाजगी एजंट हे पालक व विद्यार्थ्यांना थेट गाठून त्यांच्या सोयीच्या क्लासेस मध्ये प्रवेशासाठी आग्रह करत आहेत. या एजंटांच्या साखळी मागे मोठे अर्थकारण लपल्याची शक्यता अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे मागील दोन-तीन वर्षात निकालाची व विद्यार्थ्यांची पळवा पळवी ही बाब अनेक माध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. पण आता त्याही पुढे जाऊन थेट ऍडमिशन साठीच अनेक क्लासेसने खाजगी एंजटांची नेमणूक करून विद्यार्थ्यांना प्रलोभने देत ॲडमिशन करून घेत असल्याची सुरस चर्चा कोचिंग क्लासेस परिसरात ऐकावयास मिळत असून देशाचं भविष्य घडविणाऱ्या शिक्षण शिक्षण क्षेत्राला काळीमा लावणारी ही पद्धती अस्तित्वात आल्याने एकंदरीत संपूर्ण शिक्षण क्षेत्रावर वेगळा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आणि एकंदरीत या परिस्थितीचा फक्त फायदा होतोय तो शिक्षणाच्या बाजारातील खाजगी दलालांचा, अनेक भक्तांना हे मान्य नसले. तरी हेच वास्तव आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शेतकरी आत्महत्येची स्मशान भूमि असलेल्या महाराष्ट्रात शेतकरी आपल्या मुलाला शिकवणार कसा. दहावीनंतर सायन्स घेऊन अनेक पालक आपल्या मुलाला मेडीकल साठी प्रवेश मिळावा या हेतूने नांदेड व लातूर कडे वळत आहेत पण अलिकडच्या शिक्षण क्षेत्रातील निर्माण झालेल्या एजंटाच्या जाळ्याने भलत्याच ठिकाणी प्रवेश घेतल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचेही शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान होत असून विदयार्थी व पालकांना ही बाब लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. या अपप्रवृत्ती व सौदेबाजीला प्रशासनाने लक्ष घालून वेळीच बंधन घालावे अशी मागणी जागरुक विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.