नांदेड| जिल्ह्यात सर्वत्र 'हर घर तिरंगा' अभियानाची जनजागृती जोर धरत असून विविध शासकीय, निमशासकीय तथा खाजगी संस्था तसेच महिला मंडळे, बचत गट, प्रतिष्ठाने जनजागृती करीत आहेत. तिरंगा वाटपाचाही कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
याचाच एक भाग म्हणून जवळ्यात मुख्याध्यापक ढवळे जी. एस., संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार यांच्या पुढाकाराने गल्लोगल्ली 'हर घर तिरंगा' या अभियानांतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. यामुळे लोकांत वातावरण निर्मिती होत असून गावकरी प्रतिसाद देत आहेत. यावेळी प्रल्हाद मोरे, किशनराव गोडबोले, आनंदा गोडबोले, श्रावण गच्चे, मिलींद गोडबोले, श्रावण गच्चे, साक्षी गच्चे, गंगाधर ढवळे आदींची उपस्थिती होती.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या १३ ते १५ आॅगस्ट या कालावधीत गावागावांत प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. यासाठी ध्वजसंहितेबाबत जि. प. शाळेतील शिक्षक सखोल मार्गदर्शन करीत आहेत. या आधी जिल्हा परिषद शाळेत 'एक मूल - एक झाड आणि एक तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच हर घर तिरंगा या विषयावर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच सर्व कुटुंबांसाठी स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली होती याबाबतची माहिती मुख्याध्यापक ढवळे यांनी दिली.