माता रमाई महिला मंडळासह अनेक महिलांचा पुढाकार
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बचत गट, महिला मंडळांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या घरावर तिरंगा फडकविण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करतानाच देगाव चाळ येथील कामगार वर्गातील सर्व महिला आपल्या घरावर तिरंगा फडकविणार असल्याबाबत माता रमाई आंबेडकर महिला मंडळासह देगावचाळ येथील महिलांनी एकमुखी शपथ घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा लोखंडे, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, सुभाष लोखंडे, भगवान येवले, वसंत हाटकर माणिक हिंगोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात 'हर घर तिरंगा' या अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली. येत्या १३ ते १५ आॅगस्ट या कालावधीत सर्व महिला आपल्या घरावर तिरंगा फडकविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे अभिवचन निर्मलाबाई पंडित, शोभाबाई गोडबोले, सविताबाई नांदेडकर, रेखाबाई हिंगोले, अडवोकेट मायाताई राजभोज, चौत्राबाई चिंतुरे, सुमनबाई वाघमारे, भागीरथाबाई थोरात, आशाबाई हाटकर, गिताबाई दिपके शोभाबाई पवार रंजनाबाई हिंगोले पुष्पाबाई हटकर लक्ष्मीबाई निखाते पारूबाई हिंगोली लक्ष्मीबाई गोडबोले यांच्यासह अनेक महिलांनी दिले.
यावेळी साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे यांनी ध्वजसंहितेबाबत सखोल मार्गदर्शन केले. दरम्यान, शोभाताई गोडबोले यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सेवागौरव सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. माता रमाई महिला मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने पुरुष महिला व बालक बालिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सुभाष लोखंडे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन रमाई महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिलांनी परिश्रम घेतले.
'आम्ही माता रमाई महिला मंडळाच्या सर्व महिला देगाव चाळ आणि परिसरातील सर्व घरी जाऊन घरावर तिरंगा फडकविण्यासाठी विनंती करणार आहोत. १३ ते १५ आॅगस्ट या तिन्ही दिवशी तिरंगा घरावर फडकत ठेवण्यासाठी पहिल्या दिवशी महिलांच्याच हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण केला जावा यासाठीही आम्ही आवाहन करणार आहोत.' - शिल्पाताई लोखंडे, अध्यक्षा माता रमाई महिला मंडळ, देगाव चाळ, नांदेड.