मुंबई/हिंगोली/ नांदेड| हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे नांदेडचे संपर्क प्रमुख आनंद जाधव, हादगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोढारकर, उमेश मुंढे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे ल्याहरी येथील रहिवाशी असलेले माजी खा.सुभाष वानखेडे हे १९९५ साली केदारनाथच्या आशीर्वादाने हदगाव विधानसभेतून माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांना पराभूत करून निवडून आले. त्यांनी सलग तीन वेळा विजयाची हैट्रिक मारून हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले. त्यांनतर सुभाष वानखेडे यांना माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या विरोधात हिंगोली लोकसभा निवडणुक लढवून मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन लोकसभेत पोहचले. दुसऱ्यांदा त्यांना लोकसभेची संधी मिळाली परंतु सुभाष वानखेडे यांचा काँग्रेसचे स्वर्गीय नेते राजीव सातव यांच्यासमोर टिकाव लागलं नाही त्यामुळे त्यांना अल्पश्या मताने पराभवाचा सामना करावा लागला होता.
पराभवामुळे शिवसेनेच्याच काही नेत्यांवर नाराज झालेल्या वानखेडे यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत भाजपामध्ये प्रवेश केला. काही दिवस त्यांनी भाजपचे काम केले. पण वानखेडे हे भाजपमध्ये जास्त काळ राहिले नाही आणि यांनी ऐनवेळी काँग्रीसमध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा हिंगोली लोकसभा निवडणूक लढविली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वानखेडेंना काँग्रेसची उमेदवारी घेऊन शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविली. यापायी वानखेडेंना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान राजकीय घडामोडी सुरु असताना सध्याचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन देत बंद केल्यामुळे कट्टर शिवसैनिक असलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.