नांदेड| वर्ग कोणताही असो, शिक्षकांनी भाषा विषय सोडून पाठ्यपुस्तकात बघून शिकवण्यामुळे वर्गाची प्रगल्भ गुणवत्ता ढासळण्याची भीती असते आणि मुलांनाही आकलन, अनुमान आणि तर्क निर्मितीत अडथळे निर्माण होतात, शिक्षकांनी अर्ध्या तासाच्या अध्यापनासाठी किमान तासभर तयारी करून शिकविण्यासाठी वर्गात प्रवेश केल्यास मुले निश्चित प्रगत आणि प्रगल्भ होतील असा आशावाद राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी व्यक्त केला आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित " निर्मितीचे आकाश " या प्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ रेणू दांडेकर यांच्या शिक्षकांशी संवाद कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी डॉ नांदेडे बोलत होते.
पुढे बोलताना पूर्व शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या अत्यंत कल्पक आणि धडाडीच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी आयोजित केलेली शिक्षक संवादाची ही कार्यशाळा जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी अत्यंत उपकारक असल्याचे प्रतिपादन करून या उपक्रमाचे हार्दिक अभिनंदन केले.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रस्कर यांनी केले.. आपल्या प्रास्ताविकात शिक्षणाधिकार्यांनी या कार्यशाळेत उपस्थित असणाऱ्या धडपडणाऱ्या आदर्श शिक्षकांच्या अध्ययन अध्यापनाचे जिल्ह्यातील इतर शिक्षकही अनुकरण करतील असे प्रतिपादन केले.
जिल्ह्याच्या गुणवत्ता वृद्धीसाठी भविष्यात शिक्षक प्रज्ञावंतांच्या अशा अनेक संवाद कार्यशाळा आणि परिषदा घेण्यात येतील असेही शिक्षणाधिकारी डॉ दिग्रस्कर यांनी प्रतिपादन केले. महाराष्ट्रातील थोर शिक्षणतज्ञ डॉ रेणू दांडेकर यांनी तीन तास उपस्थित प्रज्ञावंत शिक्षकांशी प्रात्यक्षिकांसह अध्ययन अध्यापन विषयक रचनात्मक संवाद साधला... कोणत्याही महागड्या शैक्षणिक साहित्याशिवाय सर्वोत्तम अध्यापन करून विद्यार्थी प्रतिभाशाली आणि प्रगत करता येतात असेही डॉ दांडेकर यांनी प्रतिपादन केले.. या रचनात्मक शैक्षणिक कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी ,केंद्रप्रमुख आणि सोळा तालुक्यातील धडपडणाऱ्या गुणवंत शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते.
नरहर कुरुंदकर सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यशाळेबाबत शिक्षकांनी समाधान व्यक्त करून अशा कार्यशाळेच्या पुनरावृत्तीची गरज प्रतिपादन केली.. या कार्यक्रमास नांदेड शिक्षण संस्थेच्या सचिव श्यामला कुरुंदकर , माजी उच्च शिक्षण सहसंचालक डॉ हसीना बेगम, माजी शिक्षणाधिकारी डॉ जया गोरे, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक शिवा कांबळे, उपक्रमशील शिक्षक शिवाजी अंबुलगेकर यांचेसह शिक्षण क्षेत्रातील अनेक बुद्धीजीवी धडपडणारे उपक्रमशील शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे कल्पक सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन माध्यम प्रमुख डॉ विलास ढवळे यांनी केले.