मौजे काकांडी भ्रष्टाचार व बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्यामंदिर प्रकरण अनेकांना भोवणार
नांदेड। मौजे काकांडी तर्फे तुपा ता.जि.नांदेड येथील तत्कालीन ग्रामसेवक श्री अशोक बळीराम कावळे यांनी सिंचन विहीर मंजूर असलेले शेतकरी श्री देविदास देशमुख यांचे अनुदान देण्यास खोडा घातला असून लाच स्वरूपात रक्कम दिली नसल्याने रोहयोच्या कामगारांनी काम केलेले मस्टर झिरो केले व कुणाकडेही जा अनुदान मिळू देत नाही म्हणून शेतकऱ्यास वेठीस धरून अनुदानापासून वंचीत ठेवत अडचणीत आणले आहे.
त्या पिडित शेतकऱ्यास तातडीने सिंचन विहिरीचे संपूर्ण बिल देण्यात यावे व ग्रामपंचायत काकांडी येथील झालेल्या भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत व उच्चस्तरीय चौकशी करून संबंधिता विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच नांदेड शहरातील बोगस शिक्षण संस्था प्रजा बालक विद्यामंदिर गांधीनगर या शाळेवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्रा.) जि. प. नांदेड यांनी दिलेले असतानाही गटशिक्षणाधिकारी पं.स.नांदेड यांनी कारवाई केली नसल्यामुळे शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी पं.स.नांदेड यांच्यावर कारवाई करावी म्हणून जिल्हा परिषदेसमोर दि.२८ जुलैपासून सीटू कामगार संघटनेच्या वतीने अमरण उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे. संबंधित प्रजा बालक विद्यामंदिर शाळेची मान्यता रद्द करावी आणि त्या शाळेत तीस वर्षे विद्यार्थ्यांना शिकविन्याचे कार्य केलेल्या पीडित शिक्षिका अशा माधवराव गायकवाड व केशव रामजी धोंगडे यांना शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यात यावे तसेच शाळेची बांधकाम परवानगी, विद्यार्थी पटसंख्या व गांधी नगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या खुल्या जागेत बांधलेल्या बंगल्यावर कारवाई करावी अशी मागणी अनेक महिन्यांपासून करण्यात येत आहे.
उपोषणार्थी गोपीनाथ देशमुख हे सीटू संलग्न असंघटित कामगार संघटनेचे काकांडी तुपा विभाग अध्यक्ष आहेत व त्यांनी यापूर्वी देखील काकांडी येथील उपरोक्त प्रश्न घेऊन उपोषण व आंदोलन केले आहे. प्रजा बालक विद्यामंदिर शाळेचे सहशिक्षक अशा माधवराव गायकवाड व केशव रामजी धोंगडे यांनी देखील जिल्हा परिषद नांदेड व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक वेळा उपोषण व धरणे आंदोलन केली आहेत. जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे लेखी आदेश जिल्हा परिषद यांना दिले आहेत. परंतु अध्यापक कारवाई झाली नसल्यामुळे जिल्हा परिषदे समोर आंदोलन सुरू केले आहे. सुरु असलेल्या उपोषण व धरणे आंदोलनात अनेक कामगार व पदाधिकारी ठाण मांडून बसलेले आहेत.
एकंदरीतच पंचायत समिती नांदेड व शिक्षण विभाग जि.प.नांदेड यांनी योग्य कारवाई आतापर्यंत केली नसल्यामुळे मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण व धरणे आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका सीटू जिल्हा कमिटीने घेतली आहे. सदरील आंदोलनाचे नेतृत्व कॉ.उज्वला पडलवार,कॉ.मारुती केंद्रे, कॉ.नागनाथ पवार, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.शाम सरोदे, मीना आरसे,कॉ. आनंदा पवार आदी करीत आहेत.मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन संपणार नाही असे सिटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.