शेतीपिकांसह अनेक घरांचे झाले नुकसान; पंचनामे करून भारी मदत देण्याची मागणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील पावन भागात असलेल्या दरेसरसम साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून गेला आहे. या तालावर डोंगरमाथ्यावरील पावसाचे पाणी जमा होत असल्याने तलावाच्या सांडव्यातून पाणी ओसंडून वाहते आहे. हेच पाणी जवळील आंदेगाव, भुरकाडी परिसरातील गावासह शेतशिवारात शिरल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे आंदेगाव कडून हिमायतनगरला येणाऱ्या रस्त्यासह पुलाची वाट लागली असून, यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जीव मुठीत धरून जावे लागते आहे. तातडीने येथील पुलाची उंची वाढऊन या भागातील शेतीचे झालेल्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी या भागातील युवक, शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या १५ दिवसापासून हिमायतनगर तालुका परिसरात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. दि.२३ जुलै २०२२ शनिवार झालेल्या पावसामुळे तळ्याचे सांडव्यावरून पाणी वाढते वेगाने येऊन पुलावरून पाणी वाहिल्याने अनेक छोटे मोठे खड्डे पडलेत. त्यामुळे महिला मजुरदार याना शेतीत कामास जाणे बंद झाले होते. शाळकरी मुले, पवना पुढे तेलंगणाचाही रस्ता बंद असल्याने हिमायतनगर नांदेड शाळेस जाणे बंद झाल्याने लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न उद्भवला होता. त्यानंतर काल दि.२६ रोजी सकाळपासून झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले.
त्यामुळे आदिवासी बहुल भागातीळ डोंगर माथ्याच्या पावसाच्या पाण्याने दरेसरसम - पवना भागात असलेल्या साठवण तलाव पूर्णतः भरला आहे. या तलावाचे पाणी ओव्हरफ्लो होऊन सांडव्याद्वारे खाली येत आहे. त्यामुळे तलावाच्या खाली असलेल्या आंदेगाव, भुरकडी सह अनेक गावांना पुराच्या जपण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पुराचे पाणी काल आंदेगावमध्ये शिरले तर हिमायतनगर शहराकडे येणाऱ्या पुलावरून पाणी वाहून परिसरातील शेतजमीन पाण्याखाली आली होती. त्यामुळे कोवळ्या पिकावर आलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांची आणि गावकरी नागरिकांची चिंता वाढली आहे. पुराच्या पाण्यामुळे काल सायंकाळपर्यंत हिमायतनगर - आंदेगावचा संपर्क तुटलेला होता.
सकाळी पुराचे पाणी पुलावर आल्याने मात्र येथील पूल आणि रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. पुलाचा अनेक भाग खचून गेला असून, हिमायतनगर कडे येणाऱ्या रस्त्याची विल्हेवाट लागली आहे. मागील काळात हा रास्ता करताना नांदेडच्या एका ठेकेदाराने मनमानी व निकृष्ट पद्धतीने काम केल्याने रस्त्याची अल्पवधीतच वाट लागली आहे. त्यामुळे गावातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगारांना हिमायतनगर शहराकडे यातना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. हि बाब लक्षात घेता राजकीय नेत्यांनी या भागातील रस्ते व पुलाची अवस्था पाहून पुलाची उंची वाढवावी आणि रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने करून देऊ तलावाच्या पाण्यामुळे गावाला धोका होणार नाही आणि शेतीच्या नुकसानीची दखल घ्यावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी बालाजी दिपक भुसावळे, संतोष गंगाधर गटकपवाड, समशिर शेख, गंगाधर वडेवाड, राजाराम कटकमवाड, संतोष दासरवाड यासह अनेक युवकांनी केली आहे.
सांडव्याचे पाणी पूर्ण प्रवाहाने येत असल्याने येथील पूलात खोल खड्डे पडल्यामुळे यावरून जोरदार प्रवाहात व वेगाने पाणी वाहत असल्यामूळे वारंवार आंदेगाव हिमायतनगर संपर्क तुटत आहे. या पूलावरून गावकरी, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून अशा धोकादायक पूलावरून नाईलाजास्तव ये जा करत आहेत. हिमायतनगर टेंभी ते आंदेगाव रस्ता हा अत्यंत उखडून गेल्यामुळे हिमायतनगर नजीकचाही नाल्यावरून वाहणारे पाणी त्यामुळे अनेकांनी येथील व्यथा नांदेड न्यूज लाईव्हच्या निदर्शनास आणून दिली आहे. या समस्येची शासन दरबारी दखल घेतली जावी कारण थोडा फारसा जरी पाऊस झाला की, तलावाचे पाणी पुलावरून वेगात वाहून नेहमीच रस्ता बंद होत आहे.