वर्षावास पावनपर्वावर उपासकांची उपस्थिती वाढली; दररोज दोनशेहून अधिक लोकांच्या भेटी
नांदेड, प्रज्ञाधर ढवळे| आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत सर्व बौद्ध विहारात वर्षावास पावनपर्व साजरे करण्यात येते. या कालावधीत भिक्खू विहारात राहून अभ्यास, चिंतन, मनन करतात. ठिकठिकाणी ग्रंथवाचन करण्यात येते. उपासक उपासिकांसाठीही हा कालावधी पवित्र मानण्यात येतो. नांदेड तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात वर्षावास पावनपर्वावर उपासकांची उपस्थिती वाढली आहे.
दररोज दोनशेहून अधिक लोकांच्या भैटी होत आहेत. याचे कारण म्हणजे अखंड पाषाणात कोरलेली अकरा फुटांची संगमरवरी दगडाची बुध्दमूर्ती होय! ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दर महिन्याच्या पौर्णिमेला पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परित्राणपाठ, धम्मध्जारोहण, त्रिरत्नवंदना बोधीपुजा, सूत्तपठण, ध्यानसाधना, धम्मदेसना, व्याख्यान भोजनदान, आर्थिक दान, वृक्षारोपण, रक्तदान, फलदान, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम संपन्न होतात. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहतात. धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघाचे मार्गदर्शन लाभते. वर्षावास वगळता भिक्खू संघाची धम्मदान व धम्मसंदेश यात्रा नांदेड शहर, जिल्ह्यासह परभणी, हिंगोली जिल्ह्यातही चारिका करीत असते.
दर महिन्याला दहा दिवसांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच वर्षातून कधीही आणि केव्हाही श्रामणेर दीक्षा घेता येते, असे हे भारतातील एकमेव प्रशिक्षण केंद्र आहे. याशिवाय या ठिकाणी गरजू लोकांसाठी मंगल परिणयाच्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. वाढदिवसासह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. विविध बौद्ध संस्कारही केले जातात. याबरोबरच बाल श्रामणेरांच्या शिक्षणाची सोयही प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच विविध मंडळे, संस्था,समुह या ठिकाणावर श्रमदान करण्यासाठी उपस्थित राहतात. या परिसरात भिक्खू निवास, कार्यालय, प्रशिक्षण सभागृह यांचे बांधकाम श्रद्धावान उपासकांच्या आर्थिक दानांतून झाले आहे. दोन बोर घेण्यात आले आहेत. विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आता अखंड पाषाणात कोरलेली अकरा फुटांची संगमरवरी दगडाची बुध्दमूर्ती तयार झाली आहे. यासाठी एकूण अकरा लाख रुपये खर्च आला आहे. आता मुर्ती प्रतिष्ठापनेचे संकल्पचित्र तयार करण्यात आले आहे. यासाठी अंदाजे बावीस लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी विविध माध्यमांतून दानशूर तथा श्रद्धावान उपासक उपासिकांना दान पारमिता करण्याचे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.