नांदेड, अनिल मादसवार। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा हादगाव हिमायतनगर मतदार संघात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. जुलै महिना संपण्यापूर्वीच शंभर टक्के पाऊस झाल्यामुळे हादगाव हिमायतनगर तालुका मतदार संघ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी. अशी मागणी शेतकरी नेते तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने पेरण्या केल्या होत्या. परंतु कोवळे पिके असतानाच उघाड पडल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पिके वाऱ्यावर डोलत असताना हादगाव हिमायतनगर तालुक्यात मुसळधार, अति मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी,नाले,तलाव, कैनॉल, छोट्या-मोठे विहिरी तुडुंब भरून वाहू लागल्याने पाणी शेत शिवारात साचून राहिले. त्यामुळे कोवळी पिके नासुन गेल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आलं आहे. यंदा निसर्गाने घाला घातला यामुळे बळीराजा आर्थिक अडचणीत आला असून, या अडचणीतून उभारी देण्यासाठी शासनाने हदगाव हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून भरीव अशी मदत द्यावी.
तसेच नदी नाल्याच्या काठावर असलेल्या शेती देखील पुराच्या पाण्याने शेतीपिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे कोवळी पिके जमिनीसह खरडून गेल्याने पुढील काही वर्ष शेतकऱ्यांना जमिनीत पीक घेता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात शंभर टक्के नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत द्यावी. असेही जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर बाबुराव कदम कोहळीकर यांची स्वाक्षरी आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी मुख्यमंत्र्यासह संबंधित वरिष्ठ मंत्री स्तरावरही पाठविले असल्याचे नांदेड न्यूज लाईव्ह बोलताना सांगितले आहे.