नांदेड/अमरनाथ| मुसळधार पाऊस व कडकडणाऱ्या विजाच्या कोलहालात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विसाव्या अमरनाथ यात्रेतील नांदेडच्या शंभर यात्रेकरूंनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले असून सर्वांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिलीप ठाकूर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.
श्रीनगर ते कटरा या रस्त्यावर लँड स्लाइडिंग झाल्यामुळे जागोजागी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे तब्बल बारा तासाचा प्रवास करून शुक्रवारी रात्री सर्व यात्रेकरू तीन लक्झरी बस द्वारे कटरा मुक्कामी पोहोचले. शनिवारची सुरुवात मुसळधार पावसाने झाल्यामुळे तब्बल दोन तास उशिरा वैष्णोदेवीचा पर्वत चढायला सुरुवात करण्यात आली. चौदा किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी शंभर पैकी बासष्ट जणांनी घोड्याचा तर सतरा जणांनी डोलीचा वापर केला. दिलीप ठाकूर, विशाल मुळे, संजय राठोड, लक्ष्मीकांत, सटवाजीराव नांदेडकर, अशोक शिवणगावकर यांनी येण्या जाण्याचे तब्बल अठाविस किलोमीटर अंतर पायी पूर्ण केले.
खडतर असलेली अमरनाथ वैष्णोदेवी यात्रा सुखरूप पार पडावी यासाठी चार महिने चालण्याची व प्राणायामची पूर्वतयारी फक्त नांदेड मध्येच घेण्यात येते. त्याचा फायदा यात्रेकरूंना झाल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सर्वजण तंदुरुस्त आहेत. याशिवाय मंगेश घोलप यांची केटरिंग टीम दररोज वेळेवर गरमागरम महाराष्ट्रीयन भोजन देत असल्यामुळे सर्वांची प्रकृती उत्तम आहे. शंभर यात्रेकरू पैकी बेचाळीस यात्रेकरू रविवारी अमृतसर येथे मुक्काम करणार आहेत. सोमवारी सुवर्ण मंदिरात मत्था टेकून अटारी वाघा बॉर्डर ला भेट देणार आहेत. उर्वरित यात्रेकरू रविवारी जम्मू येथून हमसफर एक्सप्रेसने नांदेड कडे रवाना झाले असून सोमवारी दुपारी तीन वाजता नांदेड रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन होणार असल्याची माहिती दिलीप ठाकूर व संदीप मैंद यांनी दिली आहे.