नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलामधील संगीत विभागाच्या वतीने जागतिक संगीत दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संकुलाच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून मा. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या तथा आंतर विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील या उपस्थित होत्या. यावेळी भाषा संकुलाच्या संचालिका तथा मा. व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. शैलजा वाडीकर, कार्यक्रमाचे निमंत्रक व संकुलाचे संचालक डॉ. पी. विठ्ठल इ. मान्यवर मंचावर उपस्थित होते. तसेच डॉ. रमेश ढगे, डॉ. योगिनी सातारकर, माध्यमशास्त्र संकुलाचे डॉ. राजेंद्र गोणारकर आदींची प्रमुख उपस्थिती लाभली होती. या कार्यक्रमात एम.ए. संगीत व नाट्य द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप संमारंभ देखील पार पडला.
या कार्यक्रमात संकुलातील एम.ए. संगीत प्रथम व द्वितीय वर्ष तसेच बी.पी.ए. प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण केले. त्यामध्ये ख्याल, अभंग, नाट्यगीत, भक्तीगीत, भजन, भावगीत, गझल, पोवाडा, आंबेडकरी जलसा, कव्वाली, गोंधळ, लावणी, शेतकरी गीत, मराठी-हिंदी चित्रपट गीत, हार्मोनियम, सोलो, संबळ सोलो असे अनेक विविध कलाप्रकार अत्यंत भारदस्तपणे सादर करून उपस्थित रसिकांची दाद मिळवली. संगीत व नाट्य विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत संकुलाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करत संकुलाशी आपली घट्ट नाळ जुळलेली आहे. असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व सर्व कलाप्रकारांची विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शिवराज शिंदे, प्रा. किरण सावंत यांनी परिश्रम घेतले. यावेळी संकुलातील प्रा. प्रशांत बोम्पिलवार, प्रा. रमाकांत जोशी, डॉ. अनुराधा जोशी, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. रतन सोमवारे, डॉ. विनायक येवले, डॉ. दिपाली देशमुख व संकुलाचे कर्मचारी ज्ञानेश्वर पुयड, अजीज खान पठाण, प्रकाश रगडे इत्यादी उपस्थित होते.