मराठवाड्यातील छोट्या गावातील सामान्य कार्यकर्त्याचा असामान्य सत्कार.
मुंबई। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांना "सकाळ आयडॉल महाराष्ट्र-सन्मान भूमीपुत्रांचा" या पुरस्काराने ठाण्यातील एका विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्ना जोशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, डॉ अच्युत गोडबोले, सकाळच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशन विभागाचे संपादक राजेंद्र हुंजे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मंगरुळ या छोट्या गावातील एक तरूण मुंबईत येऊन उच्च शिक्षण घेऊन एका नामांकित कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी करत होता पण सामाजिक कार्याची ओढ असल्याने त्यांचे नोकरीत मन रमले नाही आणि त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक प्रश्न हाती घेऊन लोककल्याणाची कामे करण्यास सुरुवात केली.
“माझ्या कामाची दखल घेत ‘सकाळ’ माध्यम समूह ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने मला सन्मानित करत आहे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या कामाची ‘सकाळ’ने दखल घेतली याबद्दल मी ‘सकाळ’चा मनापासून आभारी आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या सर्वांची साथ आहे, तुमच्या शुभेच्छा व आशिर्वादाने मला यापुढेही सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल.” अशी प्रतिक्रिया राजहंस यांनी दिली आहे.