नांदेड। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि.13 जून सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास नांदेड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 हजारांची लाच स्विकारणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेच्या सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाला रंगेहात पकडले आहे. यामुळं पुन्हा एकदा खाकी वर्दीला डाग लागला जनतेच्या रक्षण व सेवेसाठी असलेल्या व्यक्तीकडून असे प्रकार होत असल्याने नागरिकांनी दाद कुणाला मागायची असा प्रश्न समोर येत आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका वाळू माफियाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या वाळू, माती, मुरूम व गिट्टीचा व्यवसाय सुरळीत चालू राहावा याकरीता स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस उपनिरिक्षक भानुदास शिवलिंग वडजे, वय 53, रा. काळेश्वर नगर, सहयोग कॅम्पस जवळ, विष्णुपुरी, नांदेड हे 10 हजार रुपयांची लाच मागणी करत आहेत. याबाबतची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अशोक इप्पर आणि इतर सर्व सहकारी पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सापळा रचला. त्यानुसार दि 13 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान भानुदास वडजे यांनी 10 हजारांची लाच स्विकारली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडून गजाआड केले. या प्रकरणी आरोपीस ताब्यात घेतले असून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
विशेष म्हणजे भानुदास वडजे यांचा सोमवार हा दिवस साप्ताहिक सुट्टीचा असतो तरी देखील ते सुट्टीच्या दिवशी भलतेच काम करत होते आणि त्यात ते रंगेहात पकडले गेले.
ही माहिती प्रसार माध्यमांकडे देतांना नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा, कार्यालय दुरध्वनी - 02262 253512, राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड मोबाईल नंबर - 7350197197 @ टोल फ्रि क्रं. 1064