नांदेड| नांदेड शहरातील खादी ग्रामउद्योग भंडार समोरील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून ट्रॅव्हल्सने प्रवासी वाहतुक केली जात आहे. मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या असल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या खाजगी प्रवाशी वाहतुक करणार्या वाहनांना शहराबाहेर काढून शहर गोंधळमुक्त, रहदारीमुक्त करावे या मागणीसाठी तमिजाबी उर्फ मुन्नीबाई शेख बाबु पटेल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 जून 2022 रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
बाफना परिसरात खादी ग्रामउद्योग भंडार समोर भर रस्त्यावर ट्रॅव्हल्स चालकांनी आपले बस्तान मांडले आहेत. रस्त्यावरच ट्रॅव्हल्स उभे राहून प्रवाशी भरणा करत असल्याने या मार्गावरून ये-जा करणार्या नागरिकांना, वाहनांना मोठा त्रास होत आहे. शहरात प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी एकमेव मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशी वाहतुक केली जाते.
नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी सर्व खाजगी प्रवाशी वाहतुक चालकांची बैठक घेवून आपआपली प्रवाशी वाहने 20 सप्टेंबर 2021 पर्यंत शहराबाहेर हलवण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र ट्रॅव्हल्स चालकांनी मुदत संपल्यानंतरही आपली वाहने हलवली नाहीत. नांदेड ते देगलूर, कंधार, बिलोली, मुखेड, हिंगोली, उमरखेड, तामसा, भोकर आदी मार्गावर याच ठिकाणावरून प्रवाशी वाहतुक केली जात आहे. काही पोलीस अधिकारी, आरटीओ अधिकारी यांच्याशी संगनमत करून ही प्रवाशी वाहतुक केली जात आहे.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून ट्रॅव्हल्स चालकांना कायमचे शहराबाहेर काढावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 जून पासून आमरण उपोषणाचा इशारा तमिजाबी उर्फ मुन्नीबाई शेख बाबु पटेल यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती पोलीस अधिक्षक, आरटीओ नांदेड, वजिराबाद पोलीस स्टेशन यांच्यासह संबंधीतांना दिल्या आहेत.