नांदेड| केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस वरील सर्व कर रद्द करुन 125 कोटी देशवासीयांना वाढत्या महागाईतून मुक्त करावे, अशी मागणी नांदेड येथील डावी लोकशाही आघाडीच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
डावी लोकशाही आघाडीतील घटक पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (से) व इतर समविचारी पक्षांकडून आज नांदेड जिल्हाधिकार्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गेल्या काही महिन्यांपासून देशातील पेट्रोल, डिझेल, घरगुती व व्यापारी वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. पेट्रोल, गॅस सिलेंडर सारख्या पेट्रोल जन्य पदार्थांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. पेट्रोल, डिझेल हे प्रामुख्याने दळण-वळण इंधन म्हणून वापरले जाते. इंधनाच्या दरात वाढ झाली की, बाजारातील सर्वच वस्तूच्या दरात वाढ होत आहे.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन मेटाकुटीला आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसवरील सर्व कर माफ करून देशातील 125 कोटी जनतेला वाढत्या महागाईतून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, सूर्यकांत वाणी, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.मोहन पाटील झोकदार, कॉ.गणेश संदुपटला, बी.व्ही.आलेवार, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.सुभाषचंद्र गजभारे, कॉ.सोनाली कांबळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.