नांदेड (अनिल मादसवार) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि इलायंटयुनिव्हर्सल स्पोर्ट्स अलायन्स इंडिया प्रा.लि., पुणे यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे विद्यापीठांतर्गत उत्कृष्ट खेळाडूंना परदेशात प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहे.
ईयुएसएआयई ही कंपनी खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे आणि खेळांना थेट प्रक्षेपणाद्वारे सर्व
सामान्यापर्यंत पोहचविणे यामध्ये अग्रगण्य आहे. या कंपनीचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार झाल्यामुळे आत्ता आपले खेळाडू देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतील अशी आशा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केली.
यापुढे राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे दूरदर्शन-१ आणि टेन स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपण होणार आहे. याशिवाय खेळतील क्षणचित्रे ही अनेक वाहिन्यावर दाखविण्यात येणार आहेत. यामधूनच चांगल्या खेळाडूंची निवड करून त्यांना परदेशात चांगले प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामधूनच खेळाडूंना देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळणार आहे. थेट प्रक्षेपीत करण्यात येणाऱ्या सामन्यामधून मिळणाऱ्या महसुलातही विद्यापीठाचा वाटा असणार आहे. त्यामुळे उत्कृष्ट खेळाडू घडविण्याबरोबरच विद्यापिठाच्या महसुलातही वाढ होणार आहे. आशा अनेक दृष्टीने विद्यापीठासाठी महत्त्वाचा असलेला हा सामंजस्य करार करण्यासाठी विद्यापीठातील क्रीडा विभागाने पुढाकार घेतला. विद्यापीठ परिक्षेत्रातील खेळाडूंसाठी हा सामंजस्य करार म्हणजे एक महत्त्वाचे पाऊल आहे, त्यामुळे खेळाडूमध्ये उत्साह आलेला आहे. हा सामंजस्य करार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर आणि प्र-कुलगुरू डॉ.गणेशचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी घडून आणला. या सामंजस्य करारावर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलानी यांनी विद्यापीठाच्या वतीने स्वाक्षरी केली.