हिमायतनगरच्या राष्ट्रीय महामार्ग कामात अंदाजपत्रकाला बगल; पूल न करताच पाईप टाकून रस्त्याचे काम सुरु -NNL

कामात सुधारणा करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या रूंदीसह, डिव्हायडर आणि पुलाची कामे करण्यात यावी 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
शहरातून होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या सहा महिन्यापासून बंद असताना आरोग्य मेळाव्यासाठी खासदार हेमंत पाटील शहरात येणार असल्याची संधी साधून ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे. मात्र यातही बोगसपणा आणत चक्क रस्त्यावरील पूल आणि डिव्हायडर गायब करून केवळ पाईप टाकून थातुर माथूर पद्धतीने रस्ताकाम करण्याचा सपाटा लावला आहे. हा प्रकार लक्षात येताच शहरातील नागरीकातून ठेकेदाराच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन अंदाजपत्रकाच्या मंजूर शेड्युलनुसार डिव्हायडर आणि रस्त्याचे काम पुलासह करण्यात यावे. अन्यथा गावातील सुजाण नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

हिमायतनगर रेल्वे गेट ते कोठारी ता.किनवट पर्यंत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रं.१६१ चे काम मागील ४ वर्षापासून रखडत सुरु आहे. सदरचे काम सुनिल हायटेक कंपनीच्या नांवे देवुन पुढे कृष्णानंद इन्फ्रा या कंपनीस दिलेले आहे. चार वर्षाच्या काळात भाईजी नामक सबकंत्राटदाराने नियमाप्रमाणे काम न करता काही लोकांची नाराजी सांभाळण्यासाठी रस्त्याची उंची, रुंदी कमी केली. तसेच रस्ता बांधकाम करताना मुरुमापर्यंत खोदकाम न करता वरच्यावर जुन्या डांबरी रस्त्यावर मटेरियल टाकून रास्ता काम उरकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या प्रकाराला संबंधित विभागाचे अभियंत्यांची मुक संमती असल्याचे या प्रकारावरून दिसत आहे. मागील ४ महिन्यापासून या रस्त्याचे काम जैसे थे ठेऊन ठेकेदाराने काय..? सध्या केले असा सवाल नागराईक उपस्थित करत आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम लवकर पूर्ण यासाठी दि.५ मार्चला आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी रास्तारोको आंदोलन केल्याने रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र पुन्हा आठ दिवसात मुरुमाची कमतरता असल्याचे कारण देत ठेकेदाराने महिन्या भरापासून काम बंद ठेवले आहे. 


त्यामुळे रस्त्याच्या कामाला म्हणावी तशी गती मिळत नसल्याने पावसाळ्यात चिखलाचा आणी उन्हाळ्यात धुळीचा सामना करण्याची वेळ शहरातील नागरिक व वाहनधारांवर येणार आहे. एवढेच  नाहीतर ठेकेदाराने शहरातील रस्त्यावर असलेल्या दोन पुलाचे काम केलेच नाही. पेट्रोलपंपा नजीकच्या  एका पुलाचे काम २ वस्रहनंतर पूर्ण केले. दुसरा पूल करण्यासाठी हुजपा कॉलेजमागून येणाऱ्या छोटा रस्ता मुख्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूने खोदून ठेऊन बांधकाम केले नाही. या पुलाचे काम ठप्प असल्याने येथे ठेकेदारने अपघात होऊ नयेत म्हणून सूचना फलक, रात्रीला वाहनधारकांना सुरक्षा मिळावी म्हणून रेडियम दिशादर्शक फलक लावणे गरजेचे होते. मात्र ठेकेदाराने याकडे लक्ष दिले नसल्याने अंधारात ये-जा करताना अनेक दुचाकी व इतर वाहने येथील खड्डेमय रस्त्याने अडखळून पडत आहेत. असाच प्रकार हिमायतनगर येथील दैनिक लोकपत्रचे तालुका प्रतिनिधी दिलीप शिंदे यांच्यासोबत ०१ एप्रिलच्या रात्रीला घडला आहे. याबाबत शिंदे यांनी पोलीस ठाण्यात ठेकदाराच्या विरोधात तक्रार दिली आहे.  


अपघाताचे हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून ठेकेदाराने पुलाचे काम न करता तातडीने या ठिकाणी पाईप टाकून रस्ता बनविण्याचा घाट सुरु केला आहे. काल दि.२० एप्रिल रोजी हिमायतनगर शहरात आयोजित आरोग्य शिबिरासाठी खासदार हेमंत पाटील यांचे आगमन होणार असल्याचे समजताच पुन्हा बंद ठेवलेल्या रस्त्याच्या कामाला ठेकेदाराने सुरुवात केली. मात्र यातही बोगसपणा आणत शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार चालूच ठेवला आहे. या रस्ता कामात सुधारणा करून अंदाजपत्रका प्रमाणे रस्त्याची रुंदी, उंची व पुलाचे काम करण्यात यावे. आगामी काळात अपघात होणार नाहीत यासाठी रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर उभारून वाहनधारक व पादचाऱ्यांना सुरक्षा द्यावी अन्यथा ठेकेदार, अभियंत्याच्या मनमानी कारभाराच्या विरोधात हिमायतनगर येथील जनता आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. 

मागील काळात हिमायतनगर भागात विकास कामाच्या उदघटनासाठी खासदार हेमंत पाटील आले असता अंदाजपत्रकाला बगल देऊन रस्त्याचे काम केले जात असल्याने भविष्यात शहर अपघाताचे केंद्र बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातून उड्डाण पूल, डिव्हायडर आणि मंजुरी प्रमाणे रस्त्याचे रुंदीकरण व नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे. आणि या कामाला गती देऊन पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून प्रवाशी, नागरीक, वाहनधारकांची होणारी अडचण दूर करावी. अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली होती. तरीदेखील ठेकेदाराकडून अंदाजपत्रकास  खुंटीला टांगून मनमानी पद्धतीने रस्त्याचे काम करून पळ काढण्याच्या तयारीत ठेकेदार असल्याचे दिसते आहे. यामुळे हिमायतनगर शहरातील विकासप्रेमी नागरिकांमध्ये रस्त्याच्या बोगस कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी