चार खरे कट्टे आणि एक खेळणी कट्टा जप्त
नांदेड| नांदेड भागात रस्त्याने-येणाऱ्या-जाणाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून लूटमार करण्याच्या तयारीत असलेल्या ५ जणांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने काल पकडले आहे. त्यांच्याकडून चार बनावट कट्टे आणि एक खेळण्याची पिस्तुल अशा पाच रिव्हॉल्व्हर जप्त केल्या आहेत. त्या सर्व आरोपीना न्यालयात हजार केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आ.पी.घोले यांनी ५ दिवस पोलीसाच्या कोठडीत पाठविले आहे. यामुळे पोलिसांना या ५ जणांची चौकशी करून आत्तापर्यंत कुठं कुठं लूटमार केली याचा तपस लावणे सोईचे होणार आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी स्थापन केलेल्या पथकाचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव मुंडे साहेब, पोलीस अंमलदार दशरथ जांभळीकर, सखाराम नवघरे, अफजल पठाण, विठ्ठल शेळके,मारोती तेलंग, गुंडेराव कर्ले, शंकर केंद्रे, सुरेश घुगे, बालाजी तेलंग, हनुमंत पोतदार, रुपेश दासरवाड, पद्मसिंग कांबळे, देविदास चव्हाण, बजरंग बोडगे, गणेश धुमाळ , शेख मोहसीन आणि संजय केंद्रे आदींना संजय बियाणी हत्याकांडातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवले होते.
त्या संदर्भांवये गस्त करत असतांना स्थागुशाच्या या पथकाला गुप्त माहिती मिळाली कि, श्रावस्तीनगर भागात कांही जण गावठी कट्ट्यांसह लपून बसलेले आहेत. तसेच नसरतपुर ते शिवाजीनगर या रस्त्यावरून जाणाऱ्या - येणाऱ्यांना पिस्तुलाच्या धाकावर लुटत आहेत. त्यावरून पोलीस पथकाने श्रावस्तीनगर भागात नाल्याजवळ बाभळीच्या झुडूपांमध्ये संशयीत रित्या दबा धरुन बसलेल्या मनिष अशोक कांबळे वय ३२ वर्ष, दक्षक उर्फ खरब्या बालाजी सरोदे वय २५ वर्ष, अक्षय उर्फ सोनु दिगंबर शंकपाळ वय 30 वर्ष, प्रशांत उर्फ बाळा रोहिदास सोनकांबळे वय 34 वर्ष, अतुल बबनराव चौदंते वय २२ वर्ष या ५ जणांना पकडले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे बनावटी अग्नीशस्त्र (कट्टे) पकडले. त्यात चार खरे कट्टे आणि एक खेळण्याचे पिस्तुल आहे. या पाच जणांना अझर खान उर्फ बांगा अझर रहिमोद्दीन खान याने हे कट्टे पुरवलेले आहेत. पोलीसांनी या कट्यांसोबत दोन जीवंत काडतुसे पकडली आहेत. एक दोरी, चार मोबाईल असा एकूण १ लाख २५ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
वरील आरोपींवर पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठानुसिंह चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३९९, ४०२ आणि सह कलम भारतीय हत्यार कायदा ३/२५, ६/२८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जळबाजी गायकवाड हे करीत आहेत. पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केलेल्यूए कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.