नांदेड| येथील सुप्रसिध्द लेखक, कवी, व्याख्याते, संशोधक, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, प्रा.डॉ. बा.दा. जोशी यांच्या पार्थिवावर दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. गोवर्धन घाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रा.डॉ. जोशी हे गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय, उमरखेड येथे माजी उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख म्हणून प्रदीर्घ सेवा दिली. त्यांनी आपल्या हयातीत विविध सामाजिक व शैक्षणिक चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन प्रबोधनाचे कार्य उत्कृष्टरित्या केले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना एम.फील. व पीएच.डी.चे मार्गदर्शनही केले. महाराष्ट्रातले एक प्रतिभासंपन्न व विचारवंत म्हणून त्यांची ख्याती होती. पैठण येथील संतकवी श्री उत्तमश्लोक, माहूरगड येथील विष्णुदासाचे अभ्यासक व संशोधक होते. तसेच ज्येष्ठ नागरिक संघटना व महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे मार्गदर्शक व प्रबोधन प्रमुख होते. त्यांनी 'सर्वांचे कल्याण व सर्वांचा उदय 'या सर्वोदयी विचारप्रणालीच्या माध्यमातून वाङमय सेवा केली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदेडे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक सुभाषराव बा-हाळे, साहित्यीक प्रभाकरराव कानडखेडकर, साहित्यीक देविदास फुलारी, प्रा.डॉ.माधव बसवंते, सामाजिक कार्यकर्ते डॉ. पी.डी.जोशी पाटोदेकर, शिक्षणाधिकारी डॉ.सौ.सविता बिरगे मॅडम, इंजि.बालाजीराव लांडगे, रमाकांत घोणसीकर, प्रा.अभय जोशी, दीपक देशमुख उमरखेडकर, प्रा.डॉ.गंदगे, डॉ.सायन्ना मठमवार आदिंनी शोकसभेत आपल्या भावना व्यक्त केल्या. शेवटी एक मिनिटाचे मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्ययात्रेस जोशी सरांवर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर विशेषत: उमरखेड (जि.यवतमाळ), तसेच पुणे, औरंगाबाद, अमरावती, यवतमाळ, पुसद, नांदेड आदि शहरातील व ग्रामीण भागातील सामान्य नागरिकही मोठया संख्येने उपस्थित होते.