आगामी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे "विद्यार्थ्यांचा जाहीरनामा" अभियान -NNL

शहर ज़िल्हाध्यक्ष कन्हैया कदम  यांची माहिती


नांदेड|
सध्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारी करत आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसही यासाठी पुढे सरसावली आहे. 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राज्यातील प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात आणि जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा जाहीरनामा हा उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमाची माहिती देताना जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांनी  सांगितले की,विद्यार्थी हा राज्यातील महत्वपूर्ण घटक आहे. आजचा सुदृढ विद्यार्थी उद्याचा सक्षम नागरिक बनतो व तो राज्याचा व देशाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी हातभार लावत असतो. 

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने ठोस धोरणे व नाविन्यपूर्ण योजना तयार करून आपल्या महाराष्ट्रातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य करणे गरजेचे आहे. हा विचार समोर ठेवून विद्यार्थी सबलीकरणासाठी आवश्यक असणाच्या उपाययोजना, रोजगार आधारित शिक्षणाच्या संकल्पना, राज्यातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला सुलभतेने शिक्षण मिळण्याची प्रक्रिया, त्यासंबंधीच्या योजना अश्या अनेक बाबींवर काम करणे गरजेचे आहे.त्या अनुषंगानेच महाराष्ट्रात येऊ घातलेल्या  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही विद्यार्थ्यांचा स्वतंत्र जाहीरनामा तयार करणार आहोत आणि हा जाहीरनामा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.

या उपक्रमतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे, पदाधिकारी राज्यातील व देशातील, विद्यार्थी- युवक कल्याण, ग्रामीण व शहरी विकास, शिक्षण, उद्योजकता, रोजगार,  आदी विषयात काम करणारी तज्ञ मंडळी, पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत, साहित्यिक, प्रशासक, व्यवसायिक व इतर मान्यवरांशी चर्चा करून मार्गदर्शन घेणार आहेत. सबंध राज्यभर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाकडून व त्यांच्या पालकांकडून सूचना मागविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 

या माध्यमातून आलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करून माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम व विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरासाठी विद्यार्थ्यांप्रती एक स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरामधून आलेल्या राज्य पातळीवरील सूचना विद्यार्थी प्रदेश कार्यालयाला पाठवून प्रदेश पातळीवर राज्यभरातून आलेल्या सूचनांचे एकत्रीत करून राज्यासाठीचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होत विद्यार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात सुचना पाठवण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी