हिमायतनगर| अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या समाप्तीनंतर कार्तिक मासाच्या पहिल्या दिवशीच्या सुरुवातीला शहरातील महिला - पुरुष वारकरी सांप्रदाईक भजनी मंडळाने काकडा दिंडीला दि.२० बुधवार पासून प्रारंभ केला आहे. यामुळे शहरात सकाळच्या रामप्रहरी हरी नामचे स्वर घुमू लागल्याने मंगलमय वातावरण निर्माण झाले असून, हरिनामाच्या मंजुळ स्वराची पहाट सर्वांसाठी सुखदायक ठरत आहे.
शेकडो वर्षाच्या परंपरेने चालत आलेल्या रिती - रिवाजाप्रमाणे सकाळच्या प्रहरी टाळ - मृदंगाच्या वाणीत काकडा दिंडी काढून सर्व देवी देवतांचे दर्शन घेणाऱ्यास मोक्ष मिळतो. आणि काकडा आरती केल्यास सुख समृद्धी नांदते व आरोग्य लाभदायी ठरते असा ग्रामीण भागातील नागरिकांचा समाज आहे. तीच परंपरा जोपासत शहरातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर, महाकाली, कालिंका महिला व पुरुष भजनी मंडळाच्या वतीने काकडा दिंडीला बुधवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. सदर दिंडी हि टाळ - मृदंग, आरती व भजन मंडळीच्या सानिध्यात काढली जात असून, या दिंडीत नागरिकांसह अबाल वृद्ध व बालके सुद्धा हाती भगवा झेंडा घेऊन सहभागी होत आहेत.
तर गृहिणी सकाळच्या प्रहरी सडा - सारवण करून घरासमोर रांगोळी काढून दिंडीचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले असल्याचे चित्र दिसत आहे. वारकरी संप्रदायाच्या महिला मंडळी श्री परमेश्वर, कालीन्का मंदिरात जाऊन काकडा आरतीत सहभागी होत असून, विविध प्रकारची आरती गाऊन ग्रामस्थांना जागृत करीत आहेत. भक्तिगीतांच्या काकडा आरतीने व शहरातील मुख्य रस्त्यावरून घुमणार्या दिंडीने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सदर काकडा आरती आणि दिंडीचा कार्यक्रम जवळपास महिनाभर चालणार असून, गुलाबी थंडीत सकाळी स्नान करून दिंडीत सहभागी होणार्या वारकरी, भक्त व बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सदर काकडा आरती आणि दिंडीचा समारोप कार्तिक पोर्णिमा समाप्तीच्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखी मिरवणूक काढून भव्य महाप्रसादाने केली जाणार आहे. सकाळच्या रामप्रहरी उठून फिरणे हे शरीरासाठी व आरोग्यासाठी लाभदायक आहे. म्हणूनच जुन्या लोकांनी दिंडीच्या प्रथेतून हि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला असल्याचे जुन्या जाणकारातून सांगितले जाते.