हिमायतनगर, अनिल मादसवार| दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने विजेवर धावणाऱ्या रेल्वे लाईनचे काम सुरु आहे. त्यासाठी हिमायतनगर येथे जागा उपलब्ध असल्याने शेकडो कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी आवश्यक असलेल्या वाढीव इमारतीचे बांधकाम केल जात आहे. या कामावर महावितरण कडून कुठलीही परवानगी अथवा अधिकृत वीज जोडणी न घेता तारांवर आकडे टाकून वीज जोडणी घेऊन संबंधित ठेकेदाराने महावितरण कंपनीला लाखोंचा चुना लावला आहे. हा प्रकार काही जागरूक नागरिक तथा पत्रकारांनी उघड केल्याने दुसऱ्या दिवशी महावितरण कर्मचाऱ्यांनी अनाधिकृत वीज जोडणीचे साहित्य जप्त केले आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी संबंधित दोन्ही ठेकेदारास तब्बल १८ लक्ष ५१ हजार ५५० रुपयाच्या दंडाची नोटीस बजावली असून, ७ दिवसात दंडाची रक्कम न भरल्यास ठेकेदारावर पोलीस कार्यवाही केली जाणार आहे. अशी माहिती उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे. या कार्यवाहीमुळे हिमायतनगर शहरात चोरून वीज वपरणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, वीज गळती थांबून महावितरणच्या वसुलीत भर पडणार आहे.
पिंपळखुटा - आदिलाबाद - मुदखेड ब्रॉडगेज रेल्वेलाईन विजेवर सुरु करण्यासाठी गेल्या २ वर्षपासून हिमायतनगर रेल्वे स्थानकावर वाढीव इमारतीसह इतर बांधकामांना वेग आला आहे. सदर काम सुरु असताना यासाठी वापरण्यात येणारी विजेवरील ग्लाइण्डर मशीन, हॅन्ड ग्लाइण्डर, मोटार पंप, वेल्डिंग मशीन, आणि रात्रीला लावण्यात येणारे एलईडी फोकस व सर्व विजेवर चालणारी उपकरणांसाठी हिमायतनगरमध्ये येणाऱ्या फुलेनगर गावठाण डि.पि.वरून लघुदाब असलेल्या हेद्रे यांच्या शेतातील घराजवळील पोल वरून थेट तार जुन्या दूरसंचार विभागाच्या पोलपर्यंत ओढण्यात आलेली आहे. त्यास संबंधित ठेकेदाराने स्थानिक अभियंत्याला हाताशी धरून मागील २० महिन्यापासून राजरोसपणे विजेची चोरी करत बांधकाम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न चालविला होता. हा प्रकार महावितरणचे अधिकारी, लाईनमन याना दिसला नसेल म्हणजे नवलच म्हणावं लागेल.
हि बाब काही पत्रकार व जागरूक नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली, मात्र पहिल्या दिवशी येथे येऊन कार्यवाही करण्यास टाळाटाळ झाली होती. त्यामुळे या संदर्भात महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री लोणे यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार निदर्शनास आणून देण्यात आला. आणि त्यांनी कां टोचल्यानंतर स्थानिक कनिष्ठ अभियंत्याने वीजचोरी झालेल्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत कार्यवाही केली आहे. त्या ठिकाणी वापरण्यात आलेल्या विजेच्या वापराचा ताळेबंद कर्तव्यदक्ष उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांनी लावून अखेर आज पंचनाम्यात नमूद डी.एम.दहिफळे आणि विवेक इंजिनियरिंग यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उगारत १८ लक्ष ५१ हजार ५५० रुप्याच्या दंडाची देयके संबंधितां देण्यात आली आहेत. या दंडाची रक्कम ७ दिवसात संबंधित ठेकेदाराने भरली नाहीतर त्यांच्यावर पोलीस कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
हि कार्यवाही पारदर्शकपणे पार पढण्यासाठी उपकार्यकारी अभियंता श्री नागेश लोणे यांनी अभ्यास करून गेल्या २० महिन्यापासून चोरी करणाऱ्या ठेकेदारावर कडक कार्यवाही करत महावितरणचा लाखो रुपयाचा तोटा भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मागील ५ वर्षात हिमायतनगर तालुक्यात वीजचोरी संदर्भात एवढी मोठी कार्यवाही होण्याची हि पहिलीच घटना असल्याने महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यव्याबद्दल वरिष्ठानी अभिनंदन केले आहे.