देगलूर| निष्क्रिय ठरलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला केला होता.त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. देगलूर- बिलोलीच्या पोटनिवडणुकीत भाजपाला यश आल्यानंतर सरकारचा करेक्ट कार्यक्रम करण्यावर शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक असल्यामुळे भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांना मतदारांनी प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.
देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ दरेकर हे देगलूर येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आ.विक्रांत पाटील, सरचिटणीस राहुल लोणीकर, संघटनमंत्री भाऊराव देशमुख, मनोज पांगरकर, दिलीप कंदकुर्ते, गंगाधर जोशी, प्रविण पाटील चिखलीकर आदिंची उपस्थिती होती.
पंढरपूरच्या निवडणुकीत भाजपा विरुध्द आघाडी सरकार असा सामना झाला होता. मतदारांनी सरकार विरोधी कौल देऊन भाजपाला विजयी केले. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडी सरकारने सत्तेचा दुरुपयोग करुन जनतेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. देगलूरच्या निवडणूकीतही पालकमंत्री दडपशाही करीत आहेत. व्यापाऱ्यांना अधिकाऱ्यांमार्फत धमकावण्याच काम पालकमंत्री अशोकराव चव्हाण करीत आहेत. अशोकराव, व्यापाऱ्यांना त्रास दिल्यास याद राखा, भाजपा खंबीरपणे व्यापाऱ्यांच्या पाठिमागे उभी आहे. व्यापाऱ्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असा विश्वास व्यक्त करुन ते म्हणाले, व्यापाऱ्यांनी निर्भिडपणे मतदान करुन या मस्तवाल सरकारला धडा शिकविण्यासाठी भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन प्रविण दरेकर यांनी केले आहे.
शिवसैनिकांच्या राजकीय भवितव्यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्ता महत्त्वाची वाटत असल्यामुळे त्यांनी साबणे यांचे राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेची जागा कॉंग्रेसला देऊन टाकली. भाजपाने मात्र साबणे यांना राजकीय जीवदान देण्यासाठी त्यांना उमेदवारी देवून निवडणूक रिंगणात उतरविले आहे. कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून मतदार साबणे यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत याची मला खात्री असल्याचे दरेकर यांनी सांगितले.