'नांदेड ग्रंथोत्सव-2014' ग्रंथप्रदर्शन

17 फेब्रुवारी पासून तीन दिवस 'नांदेड ग्रंथोत्सव-2014' ग्रंथप्रदर्शन-विक्री आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा परिषदेचा उपक्रम

नांदेड(अनिल मादसवार)महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे 17, 18 आणि 19 फेब्रुवारी या तीन दिवसीय 'नांदेड ग्रंथोत्सव-2014' चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ग्रंथप्रदर्शन व कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 17 ते 19 फेब्रुवारी या तीन दिवसात या सोहळ्यानिमित्त ग्रंथप्रेमींना विविध कार्यक्रमांची मेजवाणी लाभणार आहे.
ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्री असा या ग्रंथोत्सवाचा उद्देश असून प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि ग्रंथप्रेमींना एकाच व्यासपीठावर आणण्याचा हा आगळावेगळा सोहळा आहे. वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ग्रंथोत्सव आयोजित करण्यात येत आहेत. ग्रंथोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रंथ प्रदर्शन व विक्री असणार आहे. नांदेडसह मुंबई, पुणे, सातारा, औरंगाबाद इत्यादी ठिकाणच्या प्रकाशकांची ग्रंथविक्रीची दालने याठिकाणी ग्रंथप्रदर्शनात राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद येथील शासकीय ग्रंथागाराचे विशेष दालन या प्रदर्शनात राहणार असून या दालनात शासकीय प्रकाशने व दुर्मिळ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

उद्घाटन समारंभ
-------------------
नांदेड ग्रंथोत्सवाचे उद्घाटन सोमवार 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तु. शं. कुलकर्णी, भाषा सल्लागार समिती सदस्य प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, मराठवाडा राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. सुरेश सावंत, मराठवाडा साहित्य परिषद नांदेडचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील मान्यवर खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद सभापती तसेच वरिष्ठ अधिकारी यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचवेळी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते होईल. जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांच्या ग्रंथसंपदेचे प्रदर्शनही या ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने भरविण्यात येत आहे. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी सकाळी 8 वाजता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून ग्रंथदिंडी मल्टीपर्पज हायस्कूल वजिराबाद येथून काढण्यात येणार आहे. ही दिंडी जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृह येथे येणार आहे.

वक्तृत्व स्पर्धा
--------------
सोमवार 17 फेब्रुवारी रोजी उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत 'मराठी भाषेच्या समृद्धीसाठी माझी भुमिका' या विषयावर नांदेड जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याशिवाय शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 'मराठी भाषा ही शासकीय कामकाजात समृद्ध कशी होईल' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

बालकुमारांसाठी कविसंमेलन
------------------------------
मंगळवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता 'बालकुमांरासाठी कविसंमेलन' आयोजित करण्यात आले आहे. कवी डॉ. सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कविसंमेलनात श्री. रविचंद्र हडसणकर, श्री. माधव चुकेवाड, श्री. अशोक कुरुडे, श्री. शंकर वाडेवाले, श्रीमती ललिता शिंदे, श्री. सुधाकर गाजरे, श्री. शेषराव जाधव (लोहा), श्री. शं. ल. नाईक (देगलूर), श्रीमती अरुणा गर्जे, श्री. वीरभद्र मिरेवाड (नायगाव) हे कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. बालसाहित्यामध्ये रुची असणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थींनी बरोबरच रसिक मान्यवरांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.

प्रकट मुलाखत
----------------
मंगळवार 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु तथा ख्यातनाम विज्ञान लेखक डॉ. पंडित विद्यासागर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. विद्यापिठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. केशव सखाराम देशमुख व नांदेड आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी भिमराव शेळके हे कुलगुरुंची प्रकट मुलाखत घेणार आहेत.

सापेक्षता वादाच्या सिद्धांताला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त वर्ष 2005 मध्ये पुण्याच्या गंधर्ववेद प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व अत्यंत मागणी असणाऱ्या ख्यातनाम विज्ञान लेखक डॉ. पंडित विद्यासागर यांच्या 'महामानव आइन्स्टाईन' या ग्रंथाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचे प्रकाशन डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या ग्रंथा सुप्रसिद्ध वैज्ञानिक व साहित्यीक डॉ. जयंत नारळीकर यांची प्रस्तावना आहे.

समारोप व पारितोषिक वितरण
----------------------------------
बुधवार 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता अधिकारी व साहित्यिक यांच्या उपस्थितीत नांदेड ग्रंथोत्सवाचा समारोप व निबंध-वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या पारितोषिक वितरणाचा समारंभ होईल. समारोपानंतर गीत-संगीत व नृत्याचे अविष्कार सादर करणाऱ्या युवक-युवतींचा 'सुगंध संस्कृतीचा' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये भारुड, लावणी, गोंधळ या लोककला प्रकारांबरोबरच विविध प्रकारचे पाश्चात्य नृत्य, हास्य विनोद, मराठी-हिंदी गीत गायन तसेच वैविधयपूर्ण कलांचा अविष्कार रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील 15 कलाकरांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाचे संयोजन ज्योती जैन व भरत जेठवाणी यांनी केले आहे.

तीनही दिवस ग्रंथप्रदर्शन व विक्री सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत खुली राहणार आहे. अशा या वाचन संस्कृती वाढीस लावणाऱ्या ग्रंथोत्सवास रसिक प्रेक्षकांनी भेट देऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा व ग्रंथ खरेदी करुन आपल्या ज्ञानात भर टाकावी, असे आवाहन ग्रंथोत्सव आयोजन समितीच्यावतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत भांगे आणि जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी