लाभार्थ्यांची लुट

अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ठ करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांची लुट

हिमायतनगर(वार्ताहर)कमी किमतीत गरिबांना धान्य मिळावे या उद्देशाने अन्नसुरक्षा योजना लागू करण्यात आली. परंतु योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना अजूनही हेलपाटे मारावे लागत आहेत. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी काही स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांची आर्थिक लुट केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या प्रकाराकडे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी लक्ष देवून सामन्यांची होणारी लुट थांबवावी अशी मागणी गोर - गरीब जनतेतून जोर धरत आहे.

सामान्य तथा गरीबातील गरीब नागरिकांना अन्नधान्य कमी किमतीत उपलब्ध व्हावे आणि देशातील कोणताही गरीब व्यक्ती उपाशी पोटी राहू नये या उद्देशाने आघाडी शासनाने मोठा गज वजा करीत अन्नसुरक्षा योजना दि.०१ फेब्रुवारी २०१४ पासून लागू केली. या कायद्यान्वये शिधापत्रिकानुसार अंत्योदयच्या लाभार्थ्यांना प्रति कुंटुंब दरमहा 35 किलो धान्य वितरित करण्यात येणार आहे. तर इतर लाभार्थ्यांना 5 किलो दरमहा प्रतिव्यक्ती या प्रमाणात धान्य वितरित करण्यात येणार आहे. धान्याचा दर हा दोन्हीं प्रकारच्या लाभार्थ्यांकरिता समान म्हणजेच गहू प्रति किलो रु.2, तांदूळ प्रति किलो रु.3 व भरड धान्य प्रति किलो रु.1 असा आकारला जाणार आहे.

जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात या योजनेचा थाटात शुभारंभ करण्यात आला. परंतु बहुतांश गोरबरिब जनतेला अद्याप या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे समोर आले आहे. हिमायतनगर शहरासह तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदारांनी नवी शक्कल लढवून, लाभार्थ्यांच्या अज्ञान पणाचा फायदा घेत तुमचे नाव दारिद्र्य रेषेखाली कार्ड धारकांच्या यादीत टाकतो, तसेच अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ठ करून देतो, अशी बतावणी करून तीन आकडी रक्कमेची मागणी करीत आहेत. बहुतांश ठिकाणी या योजनेचा लाभ धनदांडग्या व उच्चभ्रू व्यक्तींना मिळत असून, खरे गरजू नागरिक दुकानदारांची मागणी पूर्ण करू न शकल्यामुळे या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. अशी माहिती प्रस्ताव भरून देण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदाराच्या दुकानाच्या चकरा मारून हैराण झालेल्या वंचित लाभार्थ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना दिली.

शासनाच्या कायदा.. लुटारूंचा फायदा..?

सामान्य नागरिकांच्या भल्याचा विचार करणाऱ्या काही ठिकाणच्या दुकानदारांनी लाभार्थ्यांची हेलपाटे वाचवीत रेशन कार्ड मिळवून देण्यापासून शर्तीचे प्रयत्न केले. तर काही दुकानदार आपल्या स्वार्थासाठी गोर - गरिबांची अश्या पद्धतीने पिळवणूक करीत असल्याने शासनाच्या कायदा..लुटारूंचा फायदा अशीच अवस्था झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी