४० वर्षात गावठाण विस्तार न झालेल्या वझरा शेख फरीद येथील गरजूंना प्लॉट व घर बांधून मिळेल - कॉ.गंगाधर गायकवाड -NNL


नांदेड|
आदिवासी,डोंगराळ व नक्षलप्रवण क्षेत्र असलेल्या माहूर तालुक्यातील ऐतिहासिक वझरा या गावाचा विस्तार वाढ करून प्लॉट पाडून घर बांधून देण्यात यावे या मागणीसाठी सीटू संलग्न मजदूर युनियनने पुढाकार घेतला असून तसे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश राऊत यांना व माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांना दिनांक 6 डिसेंबर रोजी संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे. सदरील निवेदनाची प्रत माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीस्तव मराठवाड्याचे विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना देखील पाठविण्यात आली आहे.

वझरा हे गाव शेख फरीद धबधबा व दर्ग्यामुळे ऐतिहासिक गाव म्हणून सुपरिचित आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून देखील या गावाची नोंद आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे गाव डोंगरदऱ्यात व निसर्गाच्या सानिध्यात वसलेले असून या गावाचा विस्तार वाढ मागील ४० ते ५० वर्षापासून झालेला नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६७ नुसार 'गावठाण विस्तार वाढ' योजनेअंतर्गत गावाचा विस्तार करणे आवश्यक असताना खाजगी मालकीची जमीन वझरा येथे उपलब्ध नसल्याने गाव विस्तार वाढ होऊ शकला नाही. त्यामुळे गावातील २५ ते ३० टक्के  घरे इतर गावांमध्ये स्थलांतरित होत आहेत. ही बाब गंभीर असून याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. 

गावखारी पैकी सर्व जमीन दत्ताशिखर संस्थानची सरकारी जमीन असून ताबेदार सोयीनुसार विल्हेवाट लावत आहेत परंतु त्यामुळे कायदेशीर घर बांधणे अडचणीचे ठरत आहे म्हणून गाव विस्तार वाढ योजनेची अंमलबजावणी करून प्लॉट पाडून गरजू नागरिकांना प्लॉट वाटप करावेत व घर बांधून देण्यात यावे अशी मागणी सीटू संलग्न मजदूर युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच योग्य जमीन निवडण्यासाठी काही पर्यायी जमिनीचे निरीक्षण करावे असे देखील निवेदनात सुचविण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने तीन पानाचे निवेदन सादर करण्यात आले असून अकरा जणांची तात्पुरती समिती गठित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांना कळविले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६७ च्या कायद्यानुसार वझरा शेख फरीद येथील गरजूंना शासनाच्या वतीने प्लॉट व घर बांधून मिळेल असा विश्वास कॉ.गंगाधर गायकवाड यांचा असून गरजू नागरिकांनी संघटनेच्या वतीने किंवा वैयक्तिक अर्ज सादर करावेत  असे आवाहन कॉ.गायकवाड यांनी केले आहे. कायदेशीर कारवाई साठी संघटना लढा देणार हे निश्चित झाले एवढे मात्र खरे आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी