नांदेड| माझ्या आत्तापर्यंतच्या सार्वजनिक जीवनात कायापालट सारखा अनोखा उपक्रम पाहिला नसल्यामुळे समाजातील सर्वात शेवटच्या घटकांची सेवा करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचे करावे तितके कौतुक कमी असल्या च्या भावना न्यायाधीश दलजीतकौर जज यांनी व्यक्त केल्या. २३ व्या महिन्याअखेर ३६ भ्रमिस्टांची कटिंग दाढी करून गरम पाण्याने हिवाळा असल्यामुळे गरम पाण्याने अंघोळ घातल्यानंतर स्वेटरसह नवीन कपडे देऊन कायापालट करण्यात आला.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नांदेड येथे नियमित सुरू असणाऱ्या कायापालट उपक्रमांची माहिती वाचून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीतकौर यांनी बालाजी मंदिर परिसराला भेट दिली. यावेळी अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा, सुरेश निल्लावार, महेश शिंदे, संजयकुमार गायकवाड यांनी शहरातील विविध भागातून स्वतःच्या दुचाकी वर बसून आणलेले भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांची गर्दी झाली. स्वयंसेवक बजरंग वाघमारे यांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्या सहकार्याने हिवाळा असल्यामुळे गरम पाण्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना महेंद्र शिंदे व रामशरण चौधरी यांनी साबण लावून अभ्यंग स्नान घातले.
यावेळी अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट सोबत स्वेटर देखील मिळाल्यामुळे सर्वजण खुश झाले. ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावे म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था करण्यात येते.पूर्वीचे मळके कपडे, अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून दलजीतकौर यांना नवल वाटले. यावेळी त्यांनी दिलीप ठाकूर राबवीत असलेल्या इतर उपक्रमाची आस्तेवाईकपणे चौकशी केली. असे उपक्रम सर्वत्र राबविले पाहिजे यासाठी जागृती होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी अविनाश भयानी, डी.डी.माळी, नीलिमा भयानी यांच्यासह अनेक नागरिकांनी सदिच्छा भेट दिली.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.